रूपाली केळस्कर
भारतीय युवकांच्या मनावर डिजिटल माध्यमांनी गारूड केले असून, त्याचा शैक्षणिक प्रगतीवर वाईट परिणाम होताना दिसून येतो अशी ओरड सध्या ऐकायला मिळते. कारण ‘असर’ संस्थेच्या सर्वेक्षणातून हे सत्य समोर आले आहे की, आजही देशात ग्रामीण भागातील ८ वी ९ वीच्या अनेक मुलांना नीट लिहिता – वाचता देखील येत नाही. ‘असर’च्या या संशोधनातून शिक्षणावर होणारे अनेक ‘असर’ म्हणजे ‘परिणाम’ किंवा ‘प्रभाव’अधोरेखीत होतात. त्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. मग या मुलांच्या प्रगतीवर नेमका कशाचा ‘असर’ झालाय याचे कुतूहल प्रत्येकाच्या मनात आहे.
‘असर’ या संस्थेने भारतातील ग्रामीण भागांमधील १४ ते १८ वर्षांच्या युवकांवर लक्ष केंद्रित करून केलेल्या २०२३च्या सर्वेक्षणात सुमारे २५ टक्के युवकांना आपल्या मातृभाषेतील इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील धडा वाचता येत नव्हता. ही बाब अाधुनिक भारताच्या प्रगतीला निश्चितच मारक आहे. डिजिटल युगात प्रगतीच्या वारूवर स्वार होताना मातृभाषेतून चार ओळी वाचता येऊ नये, असे असताना दुसरीकडे मात्र अनेक शाळांमध्ये रोबोटिक्स आणि कोडिंगचे प्रशिक्षण दिले जाते आहे. विद्यार्थ्यांची कार्यकुशलता वाढविण्यावर भर दिला जात आहे. एकूण हा अहवाल आल्यानंतर आपल्या शिक्षण व्यवस्थेचे चांगलेच वाभाडे निघाले. त्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारने नवे धोरण आखले.
शाळांच्या अचानक भेटी दरम्यान जर विद्यार्थी कमकुवत आढळला, तर त्याची जबाबदारी आता शिक्षकांवर असेल, ज्या शिक्षकांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्त कमी आढळून येईल, अशा शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. या भेटीचा आढावा दर महिन्याला घ्यावा लागणार आहे. तसेच केंद्र प्रमुखांना अचानक भेटी देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. ‘असर’च्या सर्वेक्षणात राज्यातील नांदेड ग्रामीणमधील ६० गावांतील १,३७४ युवकांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये कृती, कौशल्य, मूलभूत क्षमता तसेच डिजिटल साक्षरता व कौशल्य हे प्रमुख निकष ठेवण्यात आले होते. यामध्ये भूलभूत कौशल्य व डिजिटल साक्षरतेमध्ये राज्याची कामगिरी निराशाजनक आढळली होती; परंतु ही निराशा आत्ताचीची आहे असे नाही. अनेक दशकांपासूनचा हा प्रश्न आजही कायम आहे. कारण शिकणे आणि शिकवणे याचा समन्वय साधण्यासाठी मुलांना शिकण्याची आवड असावी लागते. तसेच सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, भौगोलिक बाबींचाही संबंध यामध्ये येतो. शाळेतील वातावरण, शिक्षक आणि संस्थांची धोरणे, सरकारी नियम देखील याला कारणीभूत ठरतात. मधल्या काही काळात तर ग्रामीण शिक्षकांवर शाळाबाह्य कामांचे ओझे देखील होते. त्याचा साहजिकच शिकवण्यावर परिणाम होत होता हे विसरून चालणार नाही. आता तर महाराष्ट्रात अनेक जिल्हा परिषदांच्या शाळा एक शिक्षकी बनल्या आहेत. एकच शिक्षक १ ली ते चौथीपर्यंत वर्ग शिकवतो. तसेच अनेक शाळा दुर्गम भागात आहेत, तर अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत, तर काही पावसाळ्यात शाळा गळतात देखील, या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो हे दुर्लक्षून चालणार नाही.
‘असर’ संस्थेचा शैक्षणिक रिपोर्ट प्रासार माध्यमांनी दाखवला आणि आपली मराठी शाळा आठवली. कारण या बातमीनंतर मन भूतकाळात डोकावू लागले. ‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम’ ही पूर्वीची एक म्हण यानिमित्ताने आठवली. आता तर शिक्षकांच्या हातातली ती छडी गायब झाली आहे. काही वर्षांपासून पालकांनी केलेल्या तक्रारीमुळे शिक्षकांना धड रागावताही येत नाही. तसा कायदा तयार करण्यात आला आहे. कारण काही आगावू शिक्षकांनी लेकरांना बेदम मारहाण केली. काहींनी तर अक्षरश: मुलांना बदडूनही काढले. त्याच्यांमुळे शिक्षकांच्या अनावर रागावर नियंत्रण आले खरे; पण मुलं आता कुणालाच दाद देईनाशी झाली आहेत. त्यातच मुलांची घोकंपट्टीही कमी झाली आहे.
काही वर्षांपूर्वी राज्यातल्या कोणत्याही शाळेच्या बाजूच्या रस्त्यांनी जाताना येणारा बे.. एके बे…, अ… अ… रे अननसातला… ए फाॅर ॲपल… बी फाॅर बॉल… ही एकसुरातली मोठ्या आवाजातली उजळणी आणि बाराखडी ऐकू यायची. ते एकसुरातले सूर आता फारसे ऐकू येत नाहीत. फार पूर्वीच्या काळात पावकी, निमकी, आडीचकी होती, ती तर पाच दशकांपूर्वीच नामशेष झाली. त्यावेळचे शिक्षक याची घोकंपट्टी करून घ्यायचे. आता घोकंपट्टीही बंद झाली अन् मुलांची बोटांवरची आकडेमोडही संपत गेली. कारण कॅल्क्युलेटरचा जमाना आला आणि त्याच्यावर गृहपाठही होऊ लागला. गणितं सोडवणे सोप्पे झाले. आता मोबाइलमुळे सगळे जग नजरेसामोर आले. त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी मेंदूला ताण द्यायची गरज उरली नाही. किंबहुना तो ताण आता कोणालाही नकोसा आहे.
शिक्षकांनी मुलांना छडीचे फटके मारावे या मताशी मीच काय कोणीही सहमत होणार नाही; परंतु मुलांना शिक्षकांचा धाक असणे गरजेचे आहे. पू्र्वी शिक्षकांचा धाक होता. त्याचे रागावणेही नाटकी नव्हते. कारण धपाटा मारणारे गुरूजी आणि बाईंचे हात पाठीवर कौतुकाची थाप देखील मारायचे, त्यातून एक भावनिक बंध तयार व्हायचा. हेच त्यावेळच्या शाळांच्या यशाचे गमक होते. शाळा अगदी साध्या होत्या. कॉन्व्हेंटमधली मुले देखील फार चुणचुणीत असायची. काळाच्या ओघात विद्यार्थी आणि शिक्षकांमधला भावबंध आणि शिक्षक पालकांमधला बंध तुटत गेला. त्यामुळेच नकळतपणे शिक्षण व्यवस्थेचा तोलही सुटत गेला. त्याला कारण शिक्षणाचे उदात्तीकरण होऊन त्याचे व्यापारीकरण झाले. शासनाच्या शाळांमध्ये देखील अामूलाग्र बदल होत गेले. गुरूजी आणि बाईंच्या जागी सर आणि मॅडम आणि मिस आले. ज्ञानार्जनात भावनिक पोकळी निर्माण झाली. ती कधीही भरून निघणारी नाही.
काही दशकांपूर्वी मॅट्रिक पास झालेली व्यक्ती खूपच ज्ञानी, असा समज होता. त्याला सहज नोकरी देखील मिळत असे कारण त्याचे मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत देखील उत्तम असे, आता मातृभाषा नीट वाचता येत नाही, इंग्रजी कळतं म्हणतात, पण इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात ते नीट सांगता येत नाही. दुसरे असे की, शाळेत जाऊनही मुलांना पुन्हा खासगी शिकवणीला पाठवावे लागते. तरच चांगले मार्क मिळतात. चांगली ग्रेड मिळते. मग मुले शाळेत काय शिकतात? हा प्रश्न निर्माण होतो. नुसता अभ्यास आणि अभ्यास, तरीही अनेकदा नापास. उरलेल्या वेळात मुलांच्या हातात आसतो तो मोबाइल, आपली मुले टेक्नोसेव्ही झाल्याचा आताच्या पालकांना खूप अभिमान वाटतो. मोबाइलमध्ये गुंतलेल्या मुलांना खाण्यापिण्याचे भान नसते. गेम आणि फास्टफूडच्या आहारी गेलेली मुलं, हट्टी बनत चालली आहेत. त्यांना काळाचे वेळेचे भान नाही. कारण हे भान मुळातच त्यांचे पालकही हरवत चालले आहेत. अख्खं कुटुंब फावल्या वेळात मोबाइलमध्ये व्यस्त असल्यामुळे मुलांचा अभ्यास घेणार कोण? आई की बाबा हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या आता त्रिकोणी नाहीतर चौकोनी कुटुंब असल्याने घरात शिकवायला मोठी भावंडे, आत्या, काका, आजी, अजोबा देखील नाहीत.
शहरांत खेळाची मैदाने कमी असतात; परंतु ग्रामीण मुलांना खेळण्यासाठी जागेचा अभाव नाही. पण आता ग्रामीण भागातील मुलांना खेळण्याची हौस दिसत नाही. त्यामुळे त्यांचा उत्साह कमी होत चालला आहे. अगदी कमी वयात डोळ्याला चष्मा लागतो आहे. गुटगुटीत बाळे आता लठ्ठ दिसत आहेत. मुलांमध्ये चीडचीडपणा वाढत चालला आहे. मग ती मुले शहरातील असोत की खेड्यातील; कमी अधिक फरकाने अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे.
‘ॲन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट’ अर्थात असरच्या २०२३ च्या ‘बियॉन्ड बेसिक्स’ रिपोर्टमध्ये ग्रामीण भागामधील १४ ते १८ वर्षांच्या युवकांवर लक्ष केंद्रित केले. या अहवालानुसार केवळ ५.६ टक्के युवक व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत. २००५ पासून सुरू झालेल्या या अहवालानुसार अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातील २६ राज्यांमधील २८ जिल्ह्यांतील १४ ते १८ वर्षे वयोगटातील ३४ हजार ७४५ तरुणांशी संवाद साधून हा अहवाल तयार केला. त्यात प्रत्येक राज्यांमधील एका ग्रामीण जिल्ह्याचे सर्वेक्षण केले गेले. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील दोन जिल्ह्यांची निवड सर्वेक्षणासाठी करण्यात आली होती. सुमारे २५ टक्के युवकांना आपल्या मातृभाषेतील इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील धडा वाचता येत नाही.
अर्ध्यापेक्षा जास्त युवक १ ते ३ अंकापर्यंतच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नाहीत. केवळ ४३ टक्के युवकांनी बरोबर उत्तरे दिली. यामध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या वर्गातील प्रश्नांवर या युवकांशी संवाद साधण्यात आला. अर्ध्यापेक्षा अधिक युवकांनी इंग्रजी भाषेतील वाक्य वाचली. तीन चतुर्थांश युवकांना त्याचा अर्थ सांगता आला. मुलांच्या तुलनेत मुली आपल्या क्षेत्रीय भाषेतील इयत्ता दुसरीचा धडा चांगल्या पद्धतीने वाचला. गणित आणि इंग्रजीमध्ये मुलींच्या तुलनेत मुले अधिक चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करत असल्याचे दिसून आले. सर्वेक्षण अहवालानुसार ९० टक्के युवकांच्या घरी स्मार्टफोन आहे. त्यातील सर्व युवक स्मार्टफोनचा वापर करू शकतात. त्यातही मुलींच्या तुलनेत मुलांकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे. सुमारे ८० टक्के युवकांनी केवळ चित्रपट पाहण्यासाठी, गाणे ऐकण्यासाठी म्हणजेच मनोरंजनासाठी स्मार्टफोनचा उपयोग केला.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…