
मालेगाव : वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक (defamation) मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आज मालेगाव न्यायालयात (Malegaon Court) सुनावणी होणार आहे.
२ डिसेंबरला संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर राहिले होते. या सुनावणीत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. संजय राऊत यांना याआधी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीला संजय राऊत हजर राहतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांनी दै.सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्या मार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामन्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दै.सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याने आरोप खा.संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.