नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मला सांगण्यास आनंद होतो की एल के अडवाणीजी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. मी अडवाणींशी बोललो आणि त्यांचे अभिनंदन केले. अडवाणी हे या काळातील सर्वाधिक आदरणीय नेते आहेत. तळगाळातून काम सुरू करत उपपंतप्रधानपदी पोहचलेले नेतृत्व म्हणजे लालकृष्ण अडवाणी आहेत. गृहमंत्री आणि आयबी मिनिस्टर म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि १९७४ साली ते राज्यसभेवर निवडून गेले. आणिबाणीच्या कालावधीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ साली जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले. १९८० साली भारतीय पक्षाची स्थापना झाली आणि लालकृष्ण अडवाणी हे त्याच्या संस्थापकांपैकी एक नेते होते. १९९८ साली भाजपची सत्ता आल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. तर २००२ ते २००४ या दरम्यान ते देशाचे उपपंतप्रधान बनले. १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.