Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखरेल्वे अर्थसंकल्पात आधुनिकीकरणावर भर

रेल्वे अर्थसंकल्पात आधुनिकीकरणावर भर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी अंतर्भूत करण्यात आलेल्या तरतुदींची भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळेच सर्वांचेच लक्ष रेल्वेसाठीच्या तरतुदींकडेही लागले होते. सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधांच्या सुधारणा, नवीन ट्रेन्स लॉन्च आणि रेल्वे स्थानकांचा कायापालट याकडे बजेटमध्ये लक्ष देण्यात आले आहे. यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची घसघशीत अशी तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात रेल्वेसाठी १३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण यंदाच्या अंतरिम असलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी वाढीव तरतूद केली आहे, ही महाराष्ट्रासाठी मोठी जमेची बाजू आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकांसाठी भरघोस निधी देण्यात येईल, असे चित्र आहे.

नव्या रेल्वे मार्गिकांसोबतच कसारा, कर्जत आणि पुणे या रेल्वे यार्डांचे नूतनीकरणही केले जाणार आहे. सीएसएमटी या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या टर्मिनससोबत एलटीटीच्या विकासासाठीदेखील निधी दिला जाणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण सहा नवीन मार्गिकांसाठी खास तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास १ हजार ९४० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याने अर्थसंकल्पात आधुनिकीकरणावर भर दिल्याचे दिसते.  महाराष्ट्राला बजेटमध्ये रेल्वेसाठी नेमके काय मिळाले? याविषयी सर्वसामान्य मुंबईकरांसह रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच कुतूहल आहे. त्यातच अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या कष्टकरी मुंबईकरांचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गांभीर्याने विचार केलेला दिसला. म्हणजेच मुंबईकरांसाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा पुरविण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी एमयूटीपी १ पूर्ण झाला असून २, ३ आणि ३ ए हे अन्य प्रकल्प बाकी आहेत. त्यामध्ये जितके पैसे रेल्वे देणार आहे, तितकेच पैसे राज्य सरकारदेखील एमआरव्हीसीला देणार असल्याचे ठरले आहे.

मुंबईकरांसाठी असलेल्या मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या एमयूटीपी प्रकल्पांना आतापर्यंत चांगला निधी मिळाला आहे. एमयूटीपी दोन प्रकल्पांना १०० कोटी मिळाले आहेत. त्यामध्ये जवळपास सर्व प्रकल्प पूर्ण झाले असून, काही प्रकल्पांची थोडी कामे बाकी आहेत. तसेच उर्वरित प्रकल्प यांच्यासाठी तरतूद केली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या ५व्या आणि ६व्या मार्गिकेसाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई सेंट्रल ते बोरिवली या सहाव्या मार्गिकेसाठी देखील काम सुरू करण्यात आले आहे. म्हणजेच हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास मुंबईकरांचे लोकल प्रवासातील हाल बऱ्याच अंशी कमी होतील, हे निश्चित. एमयूटीपीच्या ३ऱ्या प्रकल्पाला ३०० कोटी मिळाले असून, त्यात विरार-डहाणू या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे, तर पनवेल ते कर्जत ही नवीन रेल कॉरिडॉर उभारली जाणार आहे. तसेच ऐरोली ते कळवा या नवीन उन्नत मार्गाचे कामही हाती घेतले जाणार आहे. नवीन लोकल गाड्या (नॉन एसी) सुरू केल्या जाणार आहेत. रेल्वे गाड्यांची गती वाढविल्यास रुळांवर मोठा ताण पडून अपघात होण्याची दाट शक्यता असते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी किंवा तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात येणार आहेत.

‘एमयूटीपी ३ ए’ प्रकल्पासाठी ३८८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे गोरेगावपासून बोरिवलीपर्यंतच्या महत्त्वाच्या अशा हार्बर मार्गाचा विस्तार होणार आहे. या मार्गामुळे पश्चिम उपनगरे ही हार्बर मार्गाशी जोडली जाणार आहेत. तसे झाल्यास दोन्ही बाजूंचे प्रवासी दोन्ही मार्गांवर सहजगत्या प्रवास करू शकणार असल्याने सध्या त्यांना होणारा मनस्ताप खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच बोरिवली आणि विरार या अहोरात्र भरूभरून वाहणाऱ्या मार्गांदरम्यान आता पाचवी आणि सहावी मार्गिका तयार झाल्यास पश्चिम रेल्वेच्या या मार्गावर सतत होणाऱ्या गर्दीला आळा बसेल आणि प्रवाशांचा त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवरील सध्या मोठी गजबज असणारा कल्याण आणि बदलापूर हा मार्ग, तेथे सातत्याने वाढत चाललेल्या नवनव्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे प्रवाशांसाठी मनस्ताप देणारा ठरत आहे. या मार्गावर केवळ दोन रेल्वे मार्ग असल्याने आणि याच मार्गांवरून लोकल गाड्या आणि लांबपल्ल्यांच्या गाड्यांना ये-जा करावी लागत असल्याने गाड्यांचे वेळापत्रक सांभाळणे ही तारेवरची कसरतच असते. म्हणून येथील लोकल गाड्या आणि पर्यायाने लांबपल्ल्याच्या गाड्या या नेहमीच विलंबाने धावत असतात. त्यामुळे या मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारली गेल्यास येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, हे निश्चित. मध्य रेल्वेवरील मुख्य अशा कल्याण यार्डाचे नूतनीकरण आणि अत्याधुनिकरण केले जाणार असल्याने मध्य मार्गावरील लाखो प्रवाशांसाठी दुधात साखर असा हा योग आहे, असे म्हणावे लागेल.

पीएम गतिशक्ती उपक्रमातंर्गत कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे. हाय ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेन्सचे संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल. सेमी हाय-स्पीड ट्रेन्सची संख्या आणखी वाढवली जाईल. वंदे भारत ट्रेनमध्ये एअर कंडिशन आहे. पण चेअर कार सर्व्हिसचा विचार करता लांबपल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी या ट्रेन्स उपयुक्त नाहीत. भारतीय रेल्वे आता वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुरू करण्याचा विचार करत आहे. राजधानी एक्स्प्रेसपेक्षा या ट्रेन्स जास्त आरामदायक आणि सुविधाजनक असतील. सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार दरम्यान सीबीटीसी तंत्रज्ञानावर आधारित रेल्वे गाड्यांचे परिचालन, विविध स्थानकांचे रिडेव्हलपमेंट आणि मुंबईकर प्रवाशांसाठी नवीन एसी लोकल सुरू करण्यावर भर देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यावर, सुखकर करण्यावर मोदी सरकारने लक्ष दिले आहे, असेच म्हणावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -