शिर्डी : उद्धव ठाकरे यांचे राज्यातील दौरे ही केवळ नौटंकी असून मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तिद्वेषाची भाषणे शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उद्धव ठाकरेंनी स्विकारला असल्याची टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. दरम्यान मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराच्या निमित्ताने नागरीकांच्या भेटी घेवून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वीही उद्धव ठाकरे यांनी कोकणाचे दौरे केले. परंतू तेथील जनतेला ते काही देवू शकले नाहीत.आत्ता ही ते व्यक्तिद्वेषाच्या भाषणापलिकडे काहीही देवू शकणार नाहीत. कारण सत्ता गेल्याच्या वैफल्याने ते ग्रासले आहेत. त्यामुळे त्यांचे व्यक्तिद्वेषाची भाषा कोणालाही ऐकायला आता वेळ नाही. राज्यातील त्यांचे दौरे ही फक्त नौटंकी असून, जनतेसाठी ठाकरे गटाकडे आता कोणताही कार्यक्रम शिल्लक राहीलेला नाही, जनतेलाही ते काही देवू शकणार नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांनी वाढलेला पक्ष उद्धव ठाकरे यांनी केव्हाच गमावला. त्यांच्या पक्षाचे आमदारही त्यांना सोडून गेले. त्यामुळे व्यक्तिद्वेषाच्या भाषणापलिकडे त्यांच्यासकडे काहीही शिल्लाक नाही, असा टोलाही मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
देशामध्ये इंडिया आघाडीकडे नेतृत्व करायला एकही नेता आता शिल्लक नाही. प्रत्येकजण आता वेगळी भूमिका घेवून इंडिया आघाडीतून बाहेर पडू लागला आहे. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी, देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील जनतेची काळजी करण्यात विश्वनेते नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे. इंडिया आघाडीचे उरले सुरले अस्तित्व आता संपलेले आहे. वेगवेगळ्या राज्यात इंडिया आघाडीतील नेत्यांमध्येच मतप्रवाह उघड झाले असल्याने त्याची काळजी आघाडीच्या नेत्यांनी करावी असा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्व महसूली विभागांमध्ये आत्तापर्यंत ३ कोटी ११ लाख ६३ हजार २४१ कुटूंबांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून, आयोगाच्या निर्देशाप्रमाणे २ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत माहीती भरण्याचे काम सुरु राहणार आहे. राज्यातील सर्व विभागांची यंत्रणा तसेच महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्तम कार्यामुळेच हा डाटा उपलब्ध होवू शकला. मराठा आरक्षणाच्या दृष्टीने ही माहीती उपयुक्त ठरेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.