उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत
चालू आर्थिक वर्ष (सन २०२३ – २०२४) आता संपत आले. हा हा म्हणता ते कधी संपेल ते कळणारही नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन वैधमार्गाने कर सवलतींचा लाभ घेऊन कर बचत करणे शक्य असून आज आपण त्यांना या वर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊया, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही. या वर्षीही पगारदार व्यक्तींना आयकर मोजणीचे दोन पर्याय आहेत, यातील नवीन पर्यायात अनेक सवलती वगळून ५% ते ३०% अशी ६ टप्प्यांत कर आकारणी होईल. या पर्यायात ₹ ५० हजार प्रमाणित वजावट आणि व्यवसाय कर अधिकतम रुपये दोन हजार पाचशेची सवलत मिळते.
त्याशिवाय या दोन्ही कर मोजणी पद्धतीत एनपीएसमध्ये कर्मचाऱ्यांची मालकाने भरलेली वर्गणी, जी पगार आणि महागाई भत्त्याच्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांना १४ %, तर खासगी कर्मचाऱ्यांना १०% वर्षभरात जास्तीत जास्त सात लाख पन्नास हजार या मर्यादेत वेगळी वजावट (८०/सीसीडी (२)) मिळेल. याचा लाभ घेऊन या नवीन पर्यायात ज्यांचे करपात्र सात लाख रुपयांच्या आत आहे, त्यांना जास्तीत जास्त २५ हजार रुपयांची करसवलत (८७/ ए) मिळते. त्यामुळे फारशी कोणतीही गुंतवणूक न करता हा पर्याय स्वीकारून फायदा होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण काही प्रमाणात वाढेल. यात निव्वळ पगार हेच ज्यांचे उत्पन्नाचे साधन आहे, त्यांना सध्या दोन्ही पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत निवडण्याचा पर्याय आहे. पण ज्यांना व्यवसायचेही उत्पन्न आहे अशा व्यक्तींनी नव्या पद्धतीने करमोजणी केल्यास कायम त्याच पद्धतीने करमोजणी करावी लागेल.
भविष्यात सर्वांचा कर कायम नवीन पद्धतीने मोजला जाईल असा अंदाज आहे. सध्या अशी सक्ती नसल्याने पगारदारांनी दोन्ही पद्धतीने कर मोजणी करावी आणि कोणती पद्धत किफायतशीर राहील ती स्वीकारावी व ते विवरणपत्र भरण्यापूर्वी ठरवावे. यासाठी आवश्यकता असल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी. जुन्या पद्धतीने कर मोजणी करून आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या. करपात्र असो अथवा नसो, आपले सर्व मार्गांनी होणारे या कालखंडातील उत्पन्न यासाठी विचारात घ्यावे. उदा. पगार, घरभाडे, ठेवींवरील व्याज, पीपीएफवरील व्याज, अल्प – दीर्घ मुदतीचा नफा, लाभांश, शेअर पुन्हा खरेदीची रक्कम, व्यवसाय असल्यास त्यातून मिळालेले उत्पन्न इ., अन्य कोणत्याही मार्गाने मिळालेले उत्पन्न याची बेरीज करून त्यातून करमुक्त उत्पन्न, कायदेशीर वजावटी इ. वजा करून सन २०२३ -२०२४ या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे एकूण करपात्र उत्पन्न ₹ २ लाख ५० ते ५ लाख रुपयांच्या आत असेल, तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही.
जर आपले वय ६० हून अधिक असेल, तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹ ३ लाख ते ५ लाखांच्या आत व आपण अति वरिष्ठ नागरिक असाल म्हणजेच आपले वय ८० पेक्षा जास्त असेल, तर ही मर्यादा ₹ ५ लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे, खर्चावर नाही. (त्यासाठी GST आहे.) हे उत्पन्न ₹ ५ लाख रुपयांच्या आत असेल तर कलम ८७/ए नुसार जास्तीत जास्त ₹ १२५००/- ची करसवलत मिळते त्यामुळेच ५ लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. त्याहून अधिक उत्पन्न असेल, तर यातील ₹ २.५ लाख ते ५ लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर ५% व त्यावरील ₹ १० लाख रुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर ₹ १२५०० + २०% आणि त्यावरील करपात्र उत्पन्नावर ₹ ११२५००+ ३०% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर सरचार्ज म्हणून ४% दराने शिक्षण व उच्चशिक्षण कर द्यावा लागतो.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹ ५० लाखांच्या वर; परंतु १ कोटींच्या आत आहे, त्यांना करावर १०% आणि १ कोटींहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना १५% अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण करदायित्वांवरील कर आहे. (Tax on tax) ६० वर्षांखालील करदात्यांना ₹ ५ लाखांवर उत्पन्न असेल २.५ ते ५ लाख आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ₹ ५ लाखांवर उत्पन्न असल्यास ३ लाखांवर असलेल्या उत्पन्नावर वरील दराने कर द्यावा लागून त्यांना ८७/ए नुसार मिळणारी सूट मिळणार नाही. याशिवाय पगारदार लोकांना सेक्शन ४/ए नुसार ₹ ५०००० ची प्रमाणित वजावट मिळेल. तसेच त्यांचा कापलेला अधिकतम व्यवसाय कर (₹२५००) एकूण उत्पन्नातून वजा होईल. आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत, गुंतवणूक आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते. (पूर्वार्ध)