१२०० शाळांसाठी मॉर्डन स्कूल डिक्शनरी
१९,४०१ व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करणार
२०० शाळांमध्ये खुल्या व्यायामशाळा
मुंबई : महानगरपालिका शिक्षण विभागाचा २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा ३,४९७.८२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. प्रशासकाकडून हा दुसऱ्या वर्षीचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या योजनांचा समावेश आहे. महसुली अर्थसंकल्प ३१६७.६३ कोटी असून भांडवली अर्थसंकल्प ३३०.१९ कोटींचा आहे. प्राथमिक शिक्षणापोटी शासनाकडून ४७७९.४८ कोटी, तर माध्यमिक शिक्षणासाठी ११६६.८२ कोटी इतकी रक्कम राज्य शासनाकडून येणे बाकी आहे.
या वर्षीच्या अर्थसंकल्पातही जुन्या योजना सुरू ठेवण्यात आल्या असून त्यात शालोपयोगी वस्तूंचा मोफत पुरवठा, जलशुद्धीकरण यंत्रांचे परिरक्षण, मुलींना उपस्थिती भत्ता, दिव्यांग मुलांसाठी विविध कल्याणकारी योजना, मोफत बेस्ट पास सेवा, आरोग्य कार्यक्रम, सॅनेटरी नॅपकीन इत्यादींचा समावेश आहे. यात प्रामुख्याने कौशल विकासाला चालना देण्यासाठी पालिकेच्या एकूण १९६ शाळांमधून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १२ प्रकारच्या अभ्यासक्रमांसह २२० कौशल्य विकास केंद्र स्थापन केली जात आहेत.
पालिकेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना चालना देण्यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर विभागात तीन क्रीडा संकुले उभारण्यात येत आहेत. या अर्थसंकल्पात सुरक्षेची काळजी घेण्यात आली असून आगीपासून संरक्षण मिळावे याकरिता ३६५४ जेलफोम फायर स्प्रे खरेदी करण्यात येत असून यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.
आगामी अर्थसंकल्पात नवीन योजना व प्रकल्प राबविण्यात येणार असून यामध्ये ऑरगॅनिक फार्मिंगचा (किचन गार्डन) समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची संकल्पना समजावून भाज्या पिकविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या भाज्यांचा समावेश मध्यान्न भोजनामध्ये केला जाणार आहे. ही योजना पालिकेच्या १०० शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांकरिता १२०० शाळांसाठी मॉर्डन स्कूल डिक्शनरी तसेच प्रत्येक शिक्षकांसाठी अॅडव्हान्स डिक्शनरी देण्याचे प्रस्तावित आहे. लेखन कौशल्य व उत्तम संभाषणासाठी व्याकरणाची गरज लक्षात घेऊन १९,४०१ व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी २५ ग्रंथालयांमध्ये अभ्यासक्रमांची संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २०० शाळांमध्ये खुल्या व्यायामशाळा स्थापन करण्यात येणार आहेत.
माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साहाय्य केले जाणार असून यामध्ये तांत्रिक / व्यावसायिक /वैधकीय अभ्यासक्रमासाठी २५ हजार, वैधकीय व व्यावसायिक शिक्षणाच्या पूर्व तयारीसाठी ५० हजार आणि राज्य किंवा केंद्र शासनाच्या सरकारी नोकरीच्या पूर्व तयारीसाठी ५० हजार इतके अर्थ सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.