विशाखापट्टणम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या ६ बाद ३३६ इतकी झाली.
विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जायसवालच्या नावावर राहिला. यशस्वी जायसवालने २५७ चेंडूत १७९ नाबाद धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १७ चौकार आणि ५ षटकार लगावले.
यशस्वी जायसवालच्या नावावर पहिला दिवस
टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली नाही. भारताचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. मात्र यशस्वी जायसवालने एका बाजूने खंबीरपणे मोर्चा लढवला. भारतीय संघाला पहिला झटका ४० धावांवर बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिल ३४ धावांवर बाद झाला. तर श्रेयस अय्यरने २७ धावा केल्या. श्रेयस अय्यरला टॉम हार्टलीने बाद केले.
रजत पाटीदारला ३२ धावा करता आल्या. तो रेहान अहमदच्या बॉलवर बोल्ड झाला. विकेटकीपर फलंदाज केएस भरत १७ धावा करून बाद झाला. इंग्लंडच्या गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास आजच्या दिवसात शोएब बशीर आणि रेहान अहमदला २-२ बळी मिळवता आले. याशिवाय जेम्स अँडरसन, टॉम हार्टली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.