
मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जवळ आल्या असून काँग्रेसला (Congress) मात्र धक्क्यांवर धक्के पचवावे लागत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी कमी होत नाहीत आणि इंडिया आघाडी (INDIA Alliance) तर पार कोलमडली आहे. एवढंच नव्हे तर स्थानिक पातळीवरही काँग्रेसला याचे परिणाम सोसावे लागत आहेत. याचं कारण म्हणजे मुंबईच्या वांद्रे परिसरातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते समजले जाणारे झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हे पितापुत्र अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मुंबईत हा मोठा धक्का पचवत असतानाच आता हा दुसरा मोठा धक्का काँग्रेसला पचवावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून १० फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत बाबा सिद्दीकी?
झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जातात. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग तीन वेळा त्यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. २०००-२००४ या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर आहेत.
झिशान सिद्दीकी कोण आहेत?
झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. झिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याशिवाय झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती.