नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (१ फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी यात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Union Budget 2024) यांनी सलग सहाव्यांदा बजेट सादर केले. त्यांनी जवळपास एक तास भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सरकारी योजनांची माहिती दिली. मागील दहा वर्षांच्या काळात देशातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश मिळाले. तसेच देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची व्यवस्था सरकारने केल्याचे सितारामन यांनी सांगितले. त्यानंतर अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.
इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे, मात्र १ कोटी करदात्यांचा होणार फायदा
केंद्र सरकारने यंदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये (Income Tax) कोणताच बदल केला नाही. मध्यमवर्गीयांसाठी कररचनेत काही बदल होऊन दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आधी जो स्लॅब होता तोच कायम ठेवण्यात आला आहे. इन्कम टॅक्सबाबतची जुनी प्रकरणे मागे घेणार असल्याने १ कोटी करदात्यांचा मात्र फायदा होणार आहे.
देशात आणखी तीन रेल्वे कॉरिडॉर ऊर्जा, खनिज आणि सिमेंट वाहतुकीसाठी तयार करणार
आगामी काळात देशात आणखी तीन रेल्वे कॉरिडॉर ऊर्जा, खनिज आणि सिमेंट वाहतुकीसाठी तयार केले जातील. तसेच ४० हजार सामान्य डब्यांना वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर विकसित केले जाईल. यामुळे प्रवासी सुरक्षा आणि सुविधा देण्याचे उद्दीष्ट साध्य होईल.
३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा म्हणजे ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती योजनेचा उल्लेख केला होता. यामध्ये महिलांना आवश्यक आर्थिक ज्ञानासह सर्वसमावेशक आर्थिक साक्षरता कार्यशाळा देखील घेतल्या जातात. यामध्ये अर्थसंकल्प बचत गुंतवणूक आणि आर्थिक साधने याविषयी देखिल महिलांना ज्ञान दिले जाते.