Wednesday, May 7, 2025

देशताज्या घडामोडी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंड बंदची हाक

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंड बंदची हाक

सोरेन यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी


रांची : जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात सुनावणी होणार आहे. ईडीच्या समन्सविरोधात हेमंत सोरेन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अटकेविरोधात त्यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून हेमंत सोरेन यांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


तसेच झारखंडमधील सर्व आदिवासी संघटनांनी गुरुवारी, १ फेब्रुवारी रोजी राज्यात बंदची हाक दिली आहे. या संदर्भात पोस्टरही जारी करण्यात आले असून, त्यात हेमंत सोरेन यांचे फोटो आहे.


झारखंड मुक्ती मोर्चाने चंपाई सोरेन (Champai  Soren) यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यांनी ४३ आमदारांची पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सुपूर्द केली आहेत. त्यामुळे झारखंडमध्ये सध्या प्रचंड राजकीय उलथापालथी सुरु आहेत.


Comments
Add Comment