Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीसर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अंतरिम अर्थसंकल्प

सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अंतरिम अर्थसंकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे आभार

नवी दिल्ली : आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो सर्वसमावेशक आणि कल्पक असा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सातत्याचा विश्वास असून हा अर्थसंकल्प युवक, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या चार स्तभांचे सबलीकरण करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प २०४७ मधील विकसित भारताचा पाया रचण्याची हमी देतो. एक चांगला अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दिली. निर्मलाजींचा हा अर्थसंकल्प देशाचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

या अर्थसंकल्पात युवा भारताच्या युवा आकांक्षांचे, भारताच्या युवा आकांक्षित वर्गाचे प्रतिबिंब आहे. अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नवोपक्रमासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअपसाठी उपलब्ध कर सवलतीचा विस्तारसुद्धा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पात वित्तीय तूट नियंत्रणात ठेवताना; भांडवली खर्चासाठी 11 लाख 11 हजार 111 कोटी रुपयांची ऐतिहासिक उच्चांकी तरतूद ठेवण्यात आली आहे. अर्थतज्ज्ञांच्या भाषेत सांगायचे तर हा एक प्रकारचा स्वीट स्पॉट आहे. यामुळे भारतामध्ये 21 व्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच युवा वर्गासाठी नवीन रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. अर्थसंकल्पात वंदे भारत दर्जाच्या चाळीस हजार आधुनिक बोगी बनवून त्या सामान्य प्रवासी गाड्यांमध्ये बसवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे देशातील विविध रेल्वे मार्गावरील कोट्यवधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल.

आम्ही एक मोठे ध्येय उराशी बाळगतो, ते साध्य करतो आणि मग स्वतःसाठी आणखी मोठे ध्येय निर्धारित करतो. गरिबांसाठी आम्ही गावांमध्ये आणि शहरांमध्ये 4 कोटीपेक्षा जास्त घरे बांधली आहेत. आता आम्ही आणखी 2 कोटी नवीन घरे बांधण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. दोन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आम्ही निर्धारित केले होते. आता हे उद्दिष्ट तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे करण्यात आले आहे. आयुष्मान भारत योजनेने गरिबांची खूप मदत केली आहे. आता अंगणवाडी आणि आशा सेविका, अशा सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणावर आणि त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. रुफटॉप सोलर मोहिमेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना सोलर रूफ टॉपच्या माध्यमातून मोफत वीज मिळणार आहे. इतकेच नाही तर जास्तीची वीज सरकारला विकून लोकांना वर्षाला पंधरा ते वीस हजार रुपयांचे उत्पन्न सुद्धा मिळेल आणि प्रत्येक कुटुंबाला हे प्राप्त होईल.

आज जाहीर करण्यात आलेल्या आयकर माफी योजनेमुळे मध्यमवर्गातील सुमारे एक कोटी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागच्या सरकारांनी गेली अनेक दशके सर्वसामान्यांच्या डोक्यावर ही प्रचंड मोठी टांगती तलवार लटकवून ठेवली होती. आज या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नॅनो डीएपीचा वापर असो, जनावरांसाठी नवीन योजना असो, पीएम मत्स्य संपदा योजनेचा विस्तार असो आणि आत्मनिर्भर तेलबिया अभियान असो, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाबद्दल मी पुन्हा एकदा सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो, असे म्हणत त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -