Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीAnil Babar : आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन

Anil Babar : आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन

सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी वयाच्या ७४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर हे कट्टर समर्थक होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली.

ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचे नाव आघाडीवर होते. अनिल बाबर हे २०१९ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता.
अनिल बाबर १९९०, १९९९, २०१४, २०१९ असे चार वेळा आमदार झाले. कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या १९व्या वर्षी राजकारणात पाऊल टाकले होते. पहिल्यांदा खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो.

दरम्यान, सहा महिन्यापूर्वीच अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे निधन झाले होते. सहा महिन्यानंतर अनिल बाबर यांचेही निधन झाले. वर्षाच्या आत बाबर कुटुंबातील महत्वाच्या दोन सदस्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.

मंत्रिमंडळ बैठक रद्द

आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खानापूर-आटपाटीला जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भावपूर्ण श्रद्धांजली

सांगली येथील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांचे आज आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिवसेना परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच ते चार वेळा आमदार असा त्यांचा अतिशय प्रेरणादायी प्रवास होता. रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण शिवसेना परिवार बाबर कुटुंबियांसोबत आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -