नवी दिल्ली : ज्ञानवापीच्या (Gyanvapi) व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू (Hindu) पक्षाला असल्याचा निर्णय बुधवारी न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला १५ दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. हे तळघर मशिदीच्या खाली आहे.
आता येथे नियमित पूजा होणार आहे. काशी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे पूजा करण्यात येणार आहे. हिंदू पक्षाने हा मोठा विजय असल्याचे म्हटले असून ३० वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबर १९९३ पर्यंत येथे पूजा केली जात होती.
या प्रकरणात हिंदूंच्या बाजूने दावा केला आहे की, नोव्हेंबर १९९३ पूर्वी तत्कालीन राज्य सरकारने व्यास तळघरातील पूजा थांबवली होती. ते पुन्हा सुरु करण्याचे अधिकार दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती.
दुसरीकडे, मुस्लिम बांधवांच्या बाजूने प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला देत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावत हिंदूंच्या बाजूने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे.
१७ जानेवारी रोजी व्यासजींचे तळघर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आले. आता ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचे काम काशी विश्वनाथ ट्रस्ट करणार आहे.