सेवाव्रती: शिबानी जोशी
सांगली जिल्ह्यात संघ कार्यकर्त असलेल्या डॉ. एस. बी. कुलकर्णी, डॉ. आर. के. दिवाण आणि माधवनगरमधील काही प्रतिष्ठित व्यक्ती अशा सर्वांनी एकत्र येऊन, तिथल्या कामगार वस्तीतल्या लोकांची गरज लक्षात घेऊन १९७१ साली आरोग्य केंद्र सुरू केलं होतं. १ ऑगस्ट १९७१ रोजी या दवाखान्याची मुहूर्तमेढ, सांगलीमधील सुप्रसिद्ध नेत्र विशारद भय्यासाहेब परांजपे यांच्या हस्ते शुक्रवार पेठ येथील डॉ. बापट यांच्या जागेमध्ये रोवली गेली होती. पुढे हे केंद्र खूप विस्तारले. आज हे छोटसं बीज विस्तीर्ण होऊन तीन मजली मोठ्या इमारतरूपी फांद्यानी डवरून गेलं आहे.
१९७१ च्या सुमारास, माधवनगर व आसपासच्या परिसरात दाट कामगार वस्ती होती, पण वैद्यकीय सेवा तेथे उपलब्ध नव्हत्या. त्यावेळेस एक आदर्श असे सेवाकार्य उभे राहिले पाहिजे, या जिद्दीने डॉ. एस. बी. कुलकर्णी, डॉ. आर. के. दिवाण, डॉ. वा. वि. केळकर, अण्णासाहेब गद्रे, प्रभाकरपंत भिडे, अनंत दामले, आप्पासाहेब नातू आणि इतर कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून इथे आधी छोटा दवाखाना सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रोज डॉ. एस. बी. कुलकर्णी आणि डॉ. वा. वि. केळकर हे विनामोबदला आपली सेवा देत होते. दवाखाना सातही दिवस सुरू असे. रोज अंदाजे २५ ते ३० रुग्ण याचा लाभ घेत होते. बालकांसाठी दर बुधवारी ट्रिपल व पोलिओचे लसीकरण मोफत केले जात असे. काही दिवसांतच बालरोग तज्ज्ञ डॉ. जी. एस. जोशी, डॉ. दिलीप लागू, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आर. के. दिवाण, डॉ. कुसुमताई कोटणीस, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. नाडकर्णी, डॉ. डी. एन. जोशी, डॉ. बी. ए. खोत अशा सांगलीतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आठवड्यातून एक दिवस आपली सेवा द्यायला सुरुवात केली.
संस्थेची १९७४ साली ‘जनसेवा विश्वस्त मंडळ’ या नावाने नोंदणी झाली. आरोग्य केंद्राच्या दैनंदिन कामकाजामध्ये राष्ट्रीय संघटन मंडळ व माधवनगर मित्र मंडळ या दोन्ही संस्थांच्या कार्यकत्यांचे सहकार्यही लाभले आहे. १ ऑगस्ट १९७४ पासून डॉ. सांभारे यांची पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून तेथे नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व महाराष्ट्र दुष्काळ विमोचन समिती यांच्यातर्फे सांगली जिल्ह्यात दुष्काळ काळात सांगलीत ठिकठिकाणी १४ वैद्यकीय मदत केंद्रे चालविली जात होती. त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही आरोग्य केंद्राने पार पाडली होती. प्रामाणिक निरलस काम असेल तर अनेक मदतीचे हात पुढे येतात, त्यानुसार मुंबईच्या बोले कुटुंबीयांनी दिलेली रुग्णवाहिका दुष्काळी भागात संस्थेच्या सहकार्यानेच काम करीत होती.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब नातू यांनी स्वतःची ४००० स्क्वेअर फुटांची जागा संस्थेला देणगी दिली व त्यात दवाखानाही बांधून दिला. तिथे १९७५ साली डॉ. कोठारी आणि डॉ. वा. चि. केळकर यांच्या सहकार्याने लॅबोरेटरी सुरू करण्यात आली. १९७६ च्या जानेवारी महिन्यामध्ये सर्व ठिकाणी टायफाईडची साथ आली, तेव्हा संस्थेतर्फे अंदाजे हजार रोग्यांना मोफत रोग प्रतिबंधक लस टोचण्यात आली होती.
१९८० साली पूर्वाश्रमीच्या सांगलीत असलेले मुंबईचे डॉ. गणेश चिंतामणी पेंडसे यांच्या देणगीतून नेत्र विभाग सुरू करण्यात आला. सांगलीतील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. एस. आर. पालकर यांनी नेत्र विभागासाठी आपली सेवा द्यायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे डॉ. ए. पी. कुलकर्णी यांनी त्वचारोग विभागांमध्ये आपली सेवा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू एक एक विभाग वाढवण्यात आला. १९८० ला छाती रोग तज्ज्ञ, अस्थी रोग तज्ज्ञ, एक्स-रे मशिन आली. १९८३ पर्यंत केंद्राचे काम एका छोट्या जागेत फक्त बाह्यरुग्ण विभागामार्फत चालू होते. आंतररुग्ण विभाग सुरू करण्याच्या दृष्टीने जागेची आवश्यकता होती. त्यामुळे संस्थेच्याच बाजूची भास्करराव रानडे यांची इमारत १९८३ साली संस्थेने विकत घेतली, त्या जागेतील आंतररुग्ण विभागासाठी आवश्यक बांधकाम, प्रसूती विभागासाठी आवश्यक असे ऑपरेशन थिएटर, अशा सर्व गोष्टींची पूर्तता होऊन सांगलीतील प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. नंदा हसबनीस, डॉ. आर. के. दिवाण आणि डॉ. कुसुमताई कोटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग प्रसूती विभागाचा आंतररुग्ण विभाग सुरू झाला. त्याचा वर्षाला १५ ते १६ हजार रुग्णांना येथील आरोग्य सेवांचा लाभ होऊ लागला आहे. संस्थेचे कामकाज वाढल्याने उपलब्ध जागा कमी पडू लागली, त्यामुळे संस्थेच्या इमारतीला लागून असलेली ४००० चौ. फुटांची खुली जागा राष्ट्रीय संघटन मंडाळाकडून घेण्यात आली.
२९ नोव्हेंबर १९९१ रोजी तिथे तीन मजली इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ झाला. ३१ जानेवारी १९९३ ला नवीन इमारतीच्या तळमजल्यावर बाह्यरुग्ण विभाग सुरू झाला. ३ ऑक्टोबर १९९४ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर व आंतररुग्ण विभाग सुरू झाला. १९९५ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन सर्व विभाग नवीन इमारतीत आणून संस्थेचे सुसज्ज असे इस्पितळ उभे राहिले. जून १९९६ पासून सोनोग्राफी विभाग सुरू होऊन तीही उणीव दूर झाली. स्त्रीरोग व प्रसूती विभाग, पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी, बालरोग विभाग, दंत विभाग, नेत्र विभाग, अस्थिरोग विभाग, एक्स-रे, हृदयरोग छातीरोग विभाग, नाक-कान-घसा विभाग या सर्व विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर्स इथे उपलब्ध आहेत.
अशा प्रकारे माधवनगर व आजूबाजूच्या २२ किलोमीटरच्या परिसरातील गरीब व गरजू रुग्ण, मध्यमवर्गीय तसेच उच्च मध्यमवर्गीय रुग्णांनासुद्धा माफक दरांतील बाह्य रुग्ण व आंतररुग्ण विभागातील सर्व सेवांचा नियमित लाभ मिळू लागला आहे. रुग्णालय चालवणे ही गोष्ट सोपी नाही. इथे रुग्णांचे आरोग्य व स्वच्छतेचा दर्जा राखला जाणे महत्त्वाचे असते. २००६ मध्ये तळ मजल्यावरील जुन्या टाइल्स बदलून स्वच्छतेच्या दृष्टीने नवीन प्रकारच्या vetrified टाइल्स बसवून नवीकरण करण्यात आले. २०१२ साली पहिल्या मजल्याचे सुद्धा नवीकरण करताना प्रशस्त अशा अतिदक्षता विभागासाठी वापरता येईल, असा एक वॉर्ड आणि सर्व सोयींनी युक्त अद्ययावत स्पेशल रूम्स बांधण्यात आल्या.
२० फेब्रुवारी २०१६ रोजी संस्थेचे आधारस्तंभ, संस्थापक डॉ. एस. बी. कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची स्मृती कायम राहावी म्हणून २०१७ साली आरोग्य केंद्राचा “डॉ. एस. बी. कुलकर्णी आरोग्य केंद्र” असा नामविस्तार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात काम करत असताना रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या सामाजिक हिताचा विचार करत असताना कार्यकर्त्यांच्या असं लक्षात आलं की, शहरी भागात काय किंवा ग्रामीण भागात काय, सध्या माणसाचं आयुर्मान वाढलं आहे आणि मुलांचं बाहेरगावी जाण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक एकटे पडल्याचे दिसून येते. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी जून २०१७ मध्ये संस्थेने ‘निवारा’ या नावाने ज्येष्ठसेवाश्रम सुरू केला. या आश्रमाला कार्यकर्ते वृद्धाश्रम न म्हणता ज्येष्ठसेवाश्रम म्हणतात. इथे केवळ वयोवृद्ध नाही तर बिछान्याला खिळलेल्या रुग्णांना सुद्धा माफक दरात पण दर्जेदार आणि आपुलकीची सेवा दिली जाते. रुग्णांची आणि वृद्धांची सोय लक्षात घेऊन २०२० मध्ये स्ट्रेचर लिफ्ट बसवण्यात आली आहे.
२०२० साली संस्थेने ५० व्या वर्षांत पदार्पण केलं त्यावेळी कोरोनाची साथ असल्यामुळे मोठा समारंभ न करता संस्थेच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर एका नवीन ऑपरेशन थिएटरची सुरुवात करण्यात आली. कोरोना काळातसुद्धा सरकारी नियम पाळून रुग्णांची काळजी घेतली गेली. स्त्री रोग आणि प्रसूती विभागात त्या काळातही सेवा सुरू ठेवली होती. त्यामुळे स्त्री रुग्णांना त्याचा खूप फायदा झाला. निवारा ज्येष्ठसेवा श्रमातील सेवाही नियमित सुरू ठेवल्या होत्या. या काळात जनकल्याण समिती पुणे, यांच्याकडून संस्थेला ऑक्सिजन व्हेंटिलेटर देणगी दाखल मिळाला. वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानच्या सहकार्याने सुमारे ३००० लाभार्थींचे मोफत कोविड लसीकरण करण्यात आले होते.
संस्थेचे सामाजिक भान पाहून स्थापनेपासून १०० पेक्षा जास्त डॉक्टरांनी आरोग्य केंद्रात येऊन सेवा प्रदान केली आहे. सर्व विभांगांत अत्याधुनिक उपकरणे, रुग्णांना माफक दरात उत्कृष्ट सेवा व सुविधा, तीन सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, स्ट्रेचर लिफ्ट, २४X७ मेडिकल ऑफिसर आणि नर्सिंग स्टाफ, दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत औषधोपचार, संततिनियमनाची विनामूल्य ऑपरेशन्स, आपल्या आयुष्यातील विशेष दिवस आणखी संस्मरणीय करण्यासाठी मोफत औषध योजना, दरवर्षी १ ऑगस्ट रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ओपीडीमधील सर्व रुग्णांना मोफत औषधे तसेच त्या दिवशी होणारी नॉर्मल डिलिव्हरी मोफत, ज्येष्ठ नागरिकांना सवलत, अशा अनेक योजना या रुग्णालयात राबवल्या जातात.
गरीब आणि वंचितांना चांगली वैद्यकीय सेवा देण्याचं कार्य गेली त्रेपन्न वर्षे अथकपणे केलं जात आहे. सध्या संस्थेच्या विद्यमान विश्वस्त मंडळामध्ये डॉ. विवेक कुलकर्णी, पोपटलाल डोले, माधव वैशंपायन, अमोल करंदीकर, डॉ. श्रुती कुलकर्णी, डॉ. विवेक शिराळकर वंदना ओगले कार्य करीत आहेत. संस्थेचे कार्य पाहायला आजवर माननीय अटलबिहारी वाजपेयीजी, बाळासाहेब देवरस त्यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि मान्यवरांनी भेट दिली आहे. भविष्यात काळाची गरज ओळखून आणखीही वैद्यकीय कार्याची व्याप्ती वाढवण्याचा संस्थेचा मनोदय आहे. गेल्या वर्षी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अद्ययावत सोनोग्राफी मशीन बसवण्यात आली आहे. तसेच प्रयोगशाळा शल्यचिकित्सा विभागात नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी अद्ययावत मशीन बसवण्यात आली आहेत.
२०१७ साली निवारा ज्येष्ठसेवाश्रम सुरू केल्यापासून अशा प्रकारच्या सेवेची समाजाला नितांत गरज असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गरज बघून तिसऱ्या मजल्यावर बांधकाम करून या कार्याचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने पावलंही उचलण्यात आली आहेत. सध्या १२ ज्येष्ठांची या ठिकाणी सोय केली गेली आहे. नूतनीकरणानंतर आणखी २४ ज्येष्ठांची इथे दर्जेदार आणि सर्व सोयींनीयुक्त अशी सोय होऊ शकणार आहे. “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेने संस्थेचं काम सुरू आहे.
joshishibani@yahoo. com