Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पोपटीसाठी वालाच्या शेंगांना पसंती; पावटा, वाल, मुगाच्या शेंगांचा घमघमाट सुटला!

पोपटीसाठी वालाच्या शेंगांना पसंती; पावटा, वाल, मुगाच्या शेंगांचा घमघमाट सुटला!

माणगाव : थंडीचा मौसम सुरू झाला की खवय्यांना वेध लागतात ते वालाच्या शेंगांच्या पोपटीचे. शेतातील ताज्या वालाच्या शेंगा मातीच्या मडक्यात विशिष्ट पद्धतीने शिजवून तयार झालेल्या चवदार शेंगा, अंडी व बॉयलर कोंबडीचे मांस अशी फक्कड मेजवानी म्हणजे पोपटी. यासाठी आवश्यक असतात त्या गावठी वाल आणि मुगाच्या शेंगांचा माणगाव तालुक्यात घमघमाट सुटला असला तरी पोपटी प्रेमी गावठी वाल व मुगाच्या शेंगा यांच्या वधारलेल्या किंमतीमुळे घाट माथ्यावर येणाऱ्या शेंगांना पसंती देत आहेत.

पोपटीसाठी अनेक खवय्ये स्थानिक वालाच्या शेंगाना पसंती देतात. मात्र अद्याप स्थानिक वालाच्या शेंगा पुरेश्या प्रमाणात तयार झाल्या नसल्याने घाट माथ्यावरून येणारा पावटा पोपटीसाठी उपयोगात आणला जात आहे.

अलीकडे थंडी सुरू झाल्यानंतर शेतात लावली जाणारी ही पोपटी ग्रामीण भागात सुरू झाली असून वालाच्या शेंगांचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. यात वाला ऐवजी भाजी बाजारात सहज उपलब्ध होणारा पावटा खवय्यांच्या पसंतीस उतरत असून गावाकडील खवय्ये पोपटीसाठी पावट्याच्या शेंगा विकत घेत आहेत.

थंडीच्या दिवसात मित्र, कुटुंबातील सदस्य खास कडधान्याच्या शेतात जाऊन तयार झालेल्या वालाच्या शेंगा, अंडी, मसाला लावलेले कोंबडीचे मांस किंवा बिन मांसाची फक्त शेंगांची, मडक्यात मांडणी करून शेतातील गवऱ्या, सुके शेण,पेंढा किंवा गवत यांच्या सहाय्याने भाजणी करतात. ठराविक वेळ उष्णता दिल्यानंतर मडक्यातील शेंगा, अंडी, मांस शिजले जाते. असे शिजलेले मांस, शेंगा इत्यादी पदार्थ अतिशय चविष्ट लागतात. या मडक्यातील शेंगांची व अंड्याची चव उत्कृष्ट असल्याने ग्रामीण व शहरी भागात गेल्या काही दिवसांपासून पोपटीचे कार्यक्रम सुरू झाले असून अनेक खवय्ये आपापल्या मित्रपरिवारासह शेतात व उघड्या माळरानावर एकत्र येत पोपटी लावत आहेत. या हंगामातील वालाच्या शेंगा १५० तर घाटमाथ्यावरून मुबलक येत असलेल्या पावट्याच्या शेंगांना ग्राहकांची पसंती देखील मिळत असून ७० रुपये किलोने पावट्याच्या शेंगा भाजी बाजारात मिळत आहेत.

पोपटी लावण्यासाठी चांगले मातीचे रुंद तोंडाचे मडके, ओल्या वालाच्या किंवा पावट्याच्या शेंगा, चवीपुरते मीठ, मसाला, मांसाहारी खाणारे अंडी, चिकन किंवा कांदे, चिरलेले बटाटे इत्यादी पदार्थही या मडक्यात शेंगांचे थर रचून ठेवतात व शेतातील भामरुड सारखी वनस्पतीने मडक्याचे तोंड बंद करतात. २० ते २५ मिनिटे पाला ,पाचोळा ,गवताने पेटवून या मडक्याला उष्णता देतात. त्यानंतर योग्य शिजलेल्या या शेंगा खाण्यासाठी तयार होतात. जाणकार मंडळी पोपटी लावण्याचे काम उत्तम करतात व त्याची चवही अत्यंत वेगळी असते.

Comments
Add Comment