Wednesday, March 19, 2025
Homeदेशपरीक्षा वॉरियर बनायचे आहे, वरियर नाही

परीक्षा वॉरियर बनायचे आहे, वरियर नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला विद्यार्थ्यांना लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विद्यार्थ्यांशी परीक्षेबाबत चर्चा केली. दिल्लीतील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम झाला. देशभरातील विद्यार्थ्यांनीही व्हर्च्युअल माध्यमातून या चर्चेत सामील होऊन पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. आपल्या समस्या सांगितल्या. त्यानंतर मोदींनी मुलांना विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले की, तुम्हाला परीक्षा वॉरियर बनायचे आहे, परीक्षा वरियर नाही. तसेच पंतप्रधानांनी भारताच्या कोरोना विरुद्धच्या युद्धाचे उदाहरण दिले आणि कठीण प्रसंगांना धैर्याने कसे तोंड द्यायचे हे देखील सांगितले.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहेत. या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशभरातील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यासोबत ‘परीक्षा पे चर्चा’ केली. हा कार्यक्रम दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी चर्चा केली. बोर्ड परीक्षेपूर्वी तणाव आणि भीती कमी करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मुलांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या काळात लोकांना थाळ्या वाजवायला का सांगितले होते?, कोरोना वॉरियर्सच्या नावाने दिवे लावायला का सांगितले? याबाबत खुलासाही केला आहे. २०२० मध्ये कोरोनाच्या काळात लोकांना थाळ्या वाजवण्यास सांगण्यात आले होते. यामागचे कारण आता ४ वर्षांनंतर समोर आले आहे.

नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, थाळ्या वाजवल्याने किंवा दिवा लावल्याने कोरोनापासून दिलासा मिळत नाही, हे मला माहीत आहे. यामुळे कोरोनाचा आजार बरा होत नाही. पण कोरोनाविरुद्धच्या युद्धात देशातील जनतेला एकत्र आणण्यासाठी हे केले. जेव्हा संपूर्ण देशातील लोक एकाच वेळी थाळी वाजवतात आणि एकाच वेळी दिवे लावतात, तेव्हा एकतेची अनुभूती मिळते. आपण एकटे कोरोनाशी लढत नसून संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तरच अडचणीतून बाहेर पडता येईल.
कोरोना ही जागतिक महामारी आहे. यामुळे सर्व जग त्रस्त झाले होते. मी काय करू शकतो? असे मी देखील म्हणू शकलो असतो. पण मी तसे केले नाही. मला वाटले, मी एकटा नाही. देशात १४० कोटी लोक आहेत. सर्वांनी एकत्र येऊन या समस्येला तोंड दिल्यास या समस्येवर मात करू. म्हणूनच मी टीव्हीवर येत राहिलो. लोकांशी बोलत राहिलो. त्यामुळेच परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही कधीही घाबरू नका, आपल्याला त्याचा सामना करावा लागेल आणि विजयी व्हावे लागेल, असे पंतप्रधान मोदींनी मुलांना सांगितले.

आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक

तुम्ही एकामागून एक रिल्स पहात राहिल्यास वेळ वाया जाईल, झोपेचा त्रास होईल आणि तुम्ही काय वाचले आहे ते आठवणार नाही. झोपेला कमी लेखू नका. आधुनिक आरोग्य विज्ञान झोपेला खूप महत्त्व देते. तुम्हाला आवश्यक ती झोप मिळते की नाही याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ संवादावेळी विद्यार्थ्यांना म्हटले.

ज्या वयात आवश्यक त्या गोष्टी आहारात आहेत की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आहारातील समतोल आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे, फिटनेससाठी व्यायाम केला पाहिजे, रोज टूथब्रश करता त्याप्रमाणे व्यायामात कोणतीही तडजोड न करता सातत्य ठेवा, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -