Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीबाबत नार्वेकरांना मिळाली मुदतवाढ; आता 'या' तारखेपर्यंत निर्णय येणे अपेक्षित

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीबाबत नार्वेकरांना मिळाली मुदतवाढ; आता 'या' तारखेपर्यंत निर्णय येणे अपेक्षित

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर शिवसेना (Shivsena) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार अपात्रतेचा निकाल सोपवण्यात आला होता. यातील शिवसेनेचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर ठाकरे गट किंवा शिवसेना कोणाचेही आमदार अपात्र ठरवण्यात आले नाहीत. यानंतर आता सर्वांना राष्ट्रवादीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. हा निकाल देखील शिवसेनेप्रमाणे अजित पवारांच्या बाजूने लागण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यासाठी सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, आता यात मुदतवाढ करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत नार्वेकरांनी निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं त्यांना दिले आहेत.


सुप्रीम कोर्टात आज सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी नार्वेकरांना केवळ एक आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा अशी विनंती कोर्टाला केली.


नार्वेकरांचे वकील तुषार मेहता यांनी कोर्टाला अशी हमी दिली की ३१ जानेवारीला ही सुनावणी पूर्णपणे बंद होईल आणि निकाल राखून ठेवला जाईल. फक्त त्यांना हा निकाल लिहिण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ हवा आहे. पण यामध्ये अॅड. सिंघवींनी त्यांना एक आठवड्याचाच वेळ देण्याची मागणी केली. सुप्रीम कोर्टाने समतोल साधत त्यांना १५ दिवसांचा वेळ दिला. त्यानुसार आता जो निकाल ३१ जानेवारीपर्यंत येणं अपेक्षित होत तो आता लांबणवीर पडून १५ फेब्रुवारीला देण्यात येणार आहे.


Comments
Add Comment