Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Cow Smuggling : समृद्धी महामार्गावरुन गो तस्करी; ट्रकमध्ये कोंबलेल्या अवस्थेत आढळल्या ५० गायी

Cow Smuggling : समृद्धी महामार्गावरुन गो तस्करी; ट्रकमध्ये कोंबलेल्या अवस्थेत आढळल्या ५० गायी

धक्कादायक प्रकारात काही गायी जखमी तर काहींचा मृत्यू


वर्धा : समृद्धी महामार्गावरुन (Samrudhhi Highway) एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपघातांच्या घटनांमुळे समृद्धी महामार्ग चर्चेत असतानाच आता गो तस्करीमुळे (Cow Smuggling) तो चर्चेत आला आहे. या महामार्गावरुन संशयास्पद रितीने प्रवास करत असलेल्या एका ट्रकचा पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर त्यातून गो तस्करी होत असल्याचे समोर आले. यातील ट्रकचालकासह इतर दोघेजण ट्रकला हिंगणामध्ये एका ठिकाणी सोडून पळून गेले. या ट्रकमध्ये ५० गायी अत्यंत दाटीवाटीने कोंबून भरण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यातील काहींचा मृत्यू झाला तर अनेक गायी जखमी झाल्या आहेत. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.



नेमका काय घडलं?


समृद्धी महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास संशयास्पदरीत्या प्रवास करताना दिसून आला. त्यामुळे वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू करताच तो ट्रक आणखी जास्त वेगाने पळू लागल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले. तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेने पळाला. त्याच वेळेस अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तो ट्रक दिसला. त्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला.


अनेक वाहने पाठलाग करत असताना त्या ट्रकने नागपूर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडला. हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील तिन्ही लोक पसार झाले. जेव्हा पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ट्रकला उघडले तेव्हा त्यामध्ये ५० पेक्षा जास्त गायी अत्यंत दाटी-वाटीने कोंबून बांधण्यात आल्याचे दिसून आले. अत्यंत दाटी-वाटीने बांधल्यामुळे त्यापैकी अनेक गायींचा मृत्यू झालेला होता, तर अनेक गायी गंभीररीत्या जखमीही होत्या. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Comments
Add Comment