नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मोठी घोषणा केली. हरयाणातील आगामी विधानसभा निवडणुकीत आप एकट्याने लढणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांवर आप स्वबळावर लढणार असला तरी या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्ष इंडिया आघाडीसोबत लढणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पंजाबमध्ये आपने लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरयाणात इंडिया आघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का देत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार आहेत. बिहारमधील नितीश कुमार यांचा जेडीयू पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. मात्र, हरयाणातील लोकसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांनी दरवाजे खुले ठेवले आहेत.
हरयाणा विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेमुळे इंडिया आघाडीसाठी अडचणीचे ठरले आहे. एकीकडे सर्व राज्यात आघाडी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे त्यात सामील असलेले पक्ष एका पाठोपाठ बाहेर पडत आहेत. पश्चिम बंगाल हे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणारे पहिले राज्य आहे, जिथे तृणमूल काँग्रेसने सर्व जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच, तृणमूल काँग्रेसने सांगितले आहे की, इतर राज्यांमध्ये पक्ष इंडिया आघाडीसोबत आहे.