- हलकं-फुलकं : राजश्री वटे
भारताची शान… तिरंगा… तीन रंगांचा अभिमान! तिरंग्याच्या तीन रंगांने भारताची शान वाढते… सलाम केला जातो… अनेकांच्या बलिदानामुळे आज तो उंच उंच फडकतो आहे, गगनाला गवसणी घालू बघतोय… नकळत डोळ्यांच्या कडा पाणावतात… अभिमानाने आणि गर्वाने छाती भरून येते…
अनेकदा तीन रंग एकत्र येऊन एक सुंदर कलाकृती सादर होते! पाहूया काही…
रानातल्या वाटेवरून चालत राहा क्षितीजापर्यंत… दिसेल वर निळे आकाश… हिरव्या झाडींनी नटलेला डोंगर… पायथ्याशी लाल मातीचा गालीचा… सुंदर निसर्गसौंदर्य!
प्राजक्ताच्या पांढऱ्या फुलाला केशरी देठ, हिरव्या पानांमध्ये सजलेलंं हे फूल… सुगंधाचं वरदान याला…
गुलाल, बुक्का, शेंदूर पूजेच्या तबकाचं पावित्र्य वाढवतो !
पांढऱ्या कागदावर निळ्या शाईची अक्षरं… लाल शाईच्या शीर्षकाने उठावदार दिसतात!
निळ्या आकाशातून पांढऱ्या जलधारा काळ्या मातीच्या कुशीत झेपावतात… निसर्गाचं देणं!!
पोपटाचा हिरवा रंग, लालचुटूक चोच, डोळ्यांतील टपोरा काळा बुबूळ किती मोहक रूप मिठ्ठूचे!!
लाल चुटूक कुंकवाखाली, आडवी हिरवी चिरी, त्याखाली पिवळ्या हळदीचा ठसका… मंगल मंगल!!
पांढऱ्या शुभ्र मोत्याच्या तन्मणीच्या खोडामध्ये हिरवा-लाल खड्यांचा साज… अप्रतिम दागिना !!
पांढरे शुभ्र मोती, हिरवा पाचू, गुलाबी माणीक… सजवून मढवून नथीचा नखरा वाढवतो!!
देवळाच्या पांढऱ्या शुभ्र रूपाला, सोनेरी कळस, त्यावर भगवा झेंडा… भक्तीचा साक्षात्कार!!
गाभाऱ्यातील काळ्या विठ्ठलाला पिवळा चंदनी टीका, शुभ्र धोतर… सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…
दारातील पांढऱ्या रांगोळीवर पिवळ्या हळदीची लाल कुंकवाची पखरण… मंगल मंगल!
मीठ, हळद, तिखट… पांढरा, पिवळा, लाल याशिवाय सुगरणीचा रुचकर स्वयंपाक होणारच नाही!!
पिवळ्या कांदे-पोह्यांवर, पांढरं खोबरं नि हिरवी कोथिंबीर, अशी सजावट… तोंडाला नक्की पाणी सुटणार! पिवळं पिठलं, पांढरा भात, लाल मिरचीचा ठेचा… अहा, चवदार!!!
दहीवडे पांढरे… वर हिरव्या कोथिंबिरीचा साज, पिवळ्या बारीक शेवेची जाळी पांघरावी… अहाहा सुखद!!
चवदार बिर्याणीमध्ये पांढरा व केशरी भात, त्यामध्ये लाल चटकदार मसाला… चवदार रंगांची तृप्त सांगड!!
सगळ्या चटकदार पदार्थांपासून मनाला दिलासा देणारं टरबूज कापावंं… सुंदर देखावा तीन रंगांचा थंडगार नजारा! हिरव्या सालीखाली पांढरं आच्छादन, त्यावर लाल मगज… अहाहा!
असा हा तीन रंगांचा सोहोळा… निसर्ग, दागिन्यातील सौंदर्य, पूजेच्या तबकातील पावित्र्य, खाद्यपदार्थ खुलवणारे, भक्तीमध्ये प्रसन्नता देणारे…
असे हे तीन रंग अंतरंग खुलवत नेतात… मनाच्या गाभाऱ्यापासून… कळसापर्यंत!!