न पाहिलेला एखादा जुना सिनेमा यूट्यूबवर पाहताना त्यातली गाणी किती वेगळीच वाटतात? लहानपणी गाणे रेडिओवर ऐकताना मन:पटलावर झरझर उमटून गेलेली चित्रे किती वेगळीच होती हे लक्षात येऊन गंमत वाटते. ती गाणी आजही तरुणांच्या तोंडी ऐकायला येतात. किती पिढ्या आल्या अन् गेल्या. पण त्या गाण्यांतील कवितांची गोडी टिकून आहे.
यश चोपडा यांनी राजकुमार, बलराज सहानी, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिला टागोर अशा दिगज्जांना घेऊन काढलेला ‘वक्त’(१९६५) खूप गाजला. कथा तशी ढोबळ. हिंदी चित्रपटसृष्टीला सवयीची! एका नैसर्गिक आपत्तीत पती-पत्नी आणि मुलांची ताटातूट होते आणि ‘वक्त’चे म्हणजे नशिबाचे फेरे भोगून सगळ्यांची पुनर्भेट होते अशी सर्वसाधारण कथा!
यश चोपडांनी अख्तर मिर्झांच्या कथेला जी ट्रीटमेंट दिली होती, त्यामुळे सिनेमा कुठल्या कुठे पोहोचला. भावंडे हरविणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जीवन जगून त्यांची पुन्हा अचानक भेट होणे हा ‘वक्त’नंतर एक ट्रेंडच बनला. एकाच चित्रपटात अनेक स्टारना घेण्याचाही पायंडा पडला. वक्तचे तेलुगू (भाले अब्बयीळू) आणि मल्याळममध्ये (कोलीलक्कम) रिमेकही निघाले!
‘वक्त’चे संवाद शोलेसारखे त्याकाळी लोकांच्या तोंडी झाले होते. साहीरची गाणी तोंडपाठच होऊन गेली होती. रवी यांच्या संगीताची गोडी अवीट होती. नाट्यमय प्रसंगांनी भरलेल्या या सिनेमासाठी साहीरनी प्रत्येक प्रसंगाला अनुरूप गाणे दिले. उदा. ‘ओ मेरी जोहराजबी, तुझे मालूम नही, ‘हम जब सिमटके आपकी बाहोमे आ गये’, ‘चेहरेपे ख़ुशी छा जाती हैं, आंखोमे गुरुर आ जाता हैं’, ‘वक्तसे दिन और रात, वक्तसे कल और आज’ अशी अर्थपूर्ण गाणी होती.
लाला केदारनाथ (बलराज साहनी) या एका श्रीमंत माणसाच्या मुलाचा वाढदिवस साजरा होत असतो, तेव्हा एक ज्योतिषी त्यांना सांगतो, ‘लाला, फार गर्व करू नका, नशीब उद्या आयुष्यात काय घडवेल ते माहीत नसते. तेव्हा सावध असा.’
त्याच रात्री मोठा भूकंप होऊन केदारनाथांची प्रशस्त हवेली आणि सगळे वैभव धुळीला मिळते. तिन्ही मुले तीन दिशांना फेकली जातात. सगळे एकमेकांपासून हरवतात. साडेतीन तास चालणारा हा चित्रपट सुमधुर संगीत, अर्थपूर्ण गाणी आणि चमकदार संवादामुळे अनेकांनी अनेक वेळा पाहिला.
लाला केदारनाथ यांच्या जीवनात घडलेल्या भयंकर शोकांतिकेनंतर येणाऱ्या फिलॉसॉफिकल गाण्याच्या आधी एक
शेर होता –
‘जहाँ बस्ती थी खुशियाँ, आज हैं मातम वहाँ,
वक्त लाया था बहारें, वक्त लाया है खिजां.’
काल आनंदोत्सव सुरू होता तिथेच आज शोककळा पसरली आहे! काळानेच वसंत फुलवला होता आणि त्यानेच शरद ऋतूची पानगळ सुरू केली!
‘वक्तसे दिन और रात, वक्तसे कल और आज,
वक्तकी हर शै गुलाम, वक्तका हर शैपे राज.’
पुढे साहीर लिहितो, ‘दिवस आणि रात्र, काल आणि आज’ या सगळ्याचा निर्माता काळच आहे. सर्व गोष्टींवर काळाचेच राज्य चालते, प्रत्येक सृष्ट वस्तू त्याची गुलाम असते. काळाचे बलाढ्य सामर्थ्य स्पष्ट करताना तो म्हणतो, ‘काळाच्या गतीवरच तर चंद्रतारे फिरत असतात, त्यांची व्यवस्था काळानेच ठरवली आहे. काळापुढे राजा आणि प्रजा दोन्हीही तुच्छ आहेत!
‘वक्तकी गर्दिश से है, चाँद तारोंका निजाम
वक्तकी ठोकरमें है क्या हुकूमत क्या समाज.’
उत्साहाचे वातावरण तर काळाच्या मर्जीवरच येत जात असते. काळच माणसाला कधी फुलांची शेज देतो तर कधी त्याच्या बिछान्यावर काटे पसरवतो.
‘वक्तकी पाबंद हैं आती जाती रौनकें,
वक्त है फूलोंके सेज, वक्त है काँटोंका ताज.’
माणसाने कधीही यशावर, संपत्तीवर, शक्तीवर गर्व करू नये. काळाला भिऊनच राहावे, कारण कोणत्या क्षणी काळाची मर्जी फिरेल काही सांगता येत नसते.
‘आदमीको चाहिए वक्तसे डरकर रहे
कौन जाने किस घड़ी वक्तका बदले मिजाज.’
शेवटचे कडवे ध्वनिफितीतून गाळले गेले होते. दिल्लीच्या हिंदी बुक सेंटरने १९९३ साली प्रकाशित केलेल्या ‘गाता जाये बंजारा’ या साहिरच्या रचनासंग्रहात ते आढळते. साहिरने त्याच्या प्रामाणिक स्वभावाप्रमाणे लिहून टाकले होते. ‘काळाच्या शक्तीपुढे कितीतरी संस्कृती आल्या अन् गेल्या. त्यांच्या अवशेषांची धूळ उडत राहिली! कितीतरी धर्म आणि रूढीरिवाज नामशेष झाले.
‘वक्तके आगे उड़ी कितनी तहजीबोंकी धूल
वक्तके आगे मिटे कितने मजहब और रिवाज़.’
हे काहीसे उदासीकडे नेणारे गीत लिहिणाऱ्या साहिरचे दुसरे गाणे इतके सुंदर, लोभस आणि उत्साहाने रसरसलेले आहे की वाटावे कुणा दुसऱ्या गीतकाराने लिहिले आहे!
शशी कपूर आपल्या आर्थिक स्थितीमुळे शर्मिलाचा उन्मुक्त प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही. त्याच्यासाठी रवीजींनी महेंद्रकपूरचा आवाज निवडला होता. आशाताईंनी प्रसंगाचा मूड बरोबर ओळखून शर्मिलासाठी लाडीक दिला होता. शब्द होते –
‘दिन हैं बहारके, तेरे मेरे इकरारके
दिलके सहारे आजा प्यार करें.’
शशी कपूर मात्र अगतिकता प्रकट करताना म्हणतो, ‘आयुष्यात इतकी दु:ख आणि अडचणी आहेत की मी प्रेमाचा विचार तरी कसा करू?’
दुश्मन हैं प्यारके जब लाखों ग़म संसारके
दिलके सहारे कैसे प्यार करें?
शर्मिला अगदी आजच्या तरुण पिढीचे तत्त्वज्ञान मांडते, ‘सगळ्या जगाचे ओझे कशाला मनावर घेऊन फिरतोस. ते खाली ठेवून जरा हसत-खेळत जीवनाचा आनंद घे की!’
‘दुनियाका बोझ ज़रा दिलसे उतार दे,
छोटीसी ज़िन्दगी है, हँसके गुज़ार दे.’
शशी म्हणतो, ‘प्रिये, सगळे जीवनच मी मन मारत जगलो आहे. तूच मनाचा एकमेव आधार असलीस तरी प्रेमाचे धाडस कसे करू?
‘अपनी तो ज़िन्दगी बीती है जीको मारके
दिलके सहारे कैसे प्यार करें?’
स्वप्नांशी खेळत बसणे काही चांगले नाही, त्याने उलट सत्य स्वीकारणे कठीण होऊन बसते –
‘अच्छा नहीं होता यूँही सपनोंसे खेलना
बड़ाही कठिन है हक़ीकतोंको झेलना…’
श्रीमंत बापाची मुलगी शर्मिला जीवनाकडे स्वच्छंदीपणे बघू शकते. परिणामांची जबाबदारी घेण्याइतका आत्मविश्वासही तिच्याकडे आहे. ती म्हणते, ‘जीवलगा, व्यर्थ गोष्टी सोड. तुझे वास्तव माझ्या स्वप्नावर कुर्बान करून टाक की! काठावर उभे राहणे सोड, जीवनाची नाव आता वाहत्या पाण्यात उतरव.’
‘अपनी हक़ीक़ते मेरे सपनोंपे वारके,
दिलके सहारे आजा प्यार करें…
ऐसीवैसी बातें सभी दिलसे निकाल दे,
जीना है तो कश्तीको धारेपे डाल दे…’
साहिरने यावरही शशीच्या भूमिकेला एक तर्क दिला आहे. तो म्हणतो, जीवनाच्या खळाळत्या प्रवाहात बुडवून टाकणारे भोवरेही आहेत. त्या पुरात कसा उतरू?
धारेकी गोदमें घेरे भी हैं मज़धारके
दिलके सहारे कैसे प्यार करें?
हिंदी गीतकारांना कोणताही प्रसंग द्या, कोणत्याही पात्राच्या मनातले विचार गाण्यात मांडायला सांगा, सुंदर गाणे तयार! म्हणून तर हा ‘नॉस्टॅल्जिया अनुभवायचा!
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…