नवा खेळ
नवा खेळ खेळूया
करू नका झगडा
तीन अक्षरी शब्द सांगा
ज्याच्या शेवटी डा
जो रस्ता सरळ नाही
तो असतो वाकडा
बैलगाडीला म्हणतात
गावोगावी छकडा
पावलाचा पुढचा भाग
त्याला म्हणतात चवडा
केतकीच्या फुलांनाच
म्हणतात सारे केवडा
प्रश्नांचा निकाल लावता
केला म्हणतात निवाडा
शाहिराच्या कवनालाच
सादर होतो पोवाडा
मळखाऊ रंग म्हणता
उत्तर एकच करडा
रंग बदलणारा प्राणी
त्याचे नाव सरडा
मिरची मीठ लसणाचा
हिरवा तिखट खरडा
पोटात कळ आली की
म्हणतात आला मुरडा
राऊळी आरतीचा जसा
घुमतो सकाळी काकडा
या नव्या खेळाचा आता
कवितेत वाजतो चौघडा…
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) दोन पाय असूनसुद्धा
चालतो पायी पायी
पाण्यामध्ये पोहायची
असते याला घाई
निळा पांढरा रंग
शोभे खूप त्याला
टुंड्रा प्रदेशातून
हा कोण आला?
२) कधी घाटमाथ्याची
कधी अडचणीची
कधी नागमोडी तर
कधी लवणावरची
वळणावळणावर
गाव तिच्या येते
साऱ्यांना घेऊन
दूर कोण जाते?
३) कोळशासारखा
रंग तिचा
पोट भले मोठ्ठे
दूध तिचे पिऊन मुले
होतात धट्टेकट्टे
कडबा गवत मिळता
जिभल्या चाटत हसते
गोठ्यातून बाहेर पडता
चिखलात कोण बसते?