- क्राइम : अॅड. रिया करंजकर
माणूस प्रेमात पडतो, तेव्हा काय सत्य आहे, काय खोटं आहे? ही जाणून घेण्याची त्याची कुवत संपलेली असते. पण प्रेम आंधळं असतं. अशीच सोनालीची गत झाली होती. ती आपल्या घरातील लोकांवर अजिबात विश्वास ठेवत नव्हती.
प्रेम हे आंधळ असतं. ही जी म्हण आहे ती तंतोतंत खरी आहे. माणूस जेव्हा प्रेमात पडतो, तेव्हा त्याला आजूबाजूचं काही दिसत नाही. काय सत्य आहे, काय खोटं आहे ही जाणून घेण्याची कुवत संपलेली असते.
सोनाली व रूपेश हे शेजारी होते. दोघे अल्पवयीन होते. एकत्र लहानाचे मोठे झाले. त्याच्यामुळे साहजिक तरुण होताना त्यांना दोघांना एकमेकांची, तारुण्याची ओढ लागली होती आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सोनालीला तिच्या घरच्या लोकांनी समजावले होते. “आपले शेजारी हे चांगले संस्कार असलेली माणसं नाहीयेत. तुझं शिक्षणाचं वय आहे. पहिले शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभ राहा. मग एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्न करून देऊ.” पण प्रेम आंधळ असतं, तशाचप्रमाणे सोनालीची गत झाली होती. ती आपल्या घरातील लोकांवर अजिबात विश्वास ठेवत नव्हती. एकदा गावात कार्यक्रम असल्यामुळे सगळी गावातील लोकं त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होते. पण कार्यक्रमातून रूपेश आणि सोनाली मात्र घरी आले होते. घरी कोणी नसल्यामुळे ते दोघं एकत्र आले. या गोष्टीची त्यांना सवय लागली आणि जिकडे एकांत मिळेल, तिकडे हे दोघे जाऊ लागले आणि ही गोष्ट एकदा रूपेशच्या वडिलांनी बघितली आणि सोनाली कुठे दिसली आजूबाजूला, तर रूपेशचे वडील तिला कुठेही हात लावायला लागले.
एक दिवस त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र तिने ही सर्व गोष्ट आपल्या घरातील लोकांना सांगितली आणि मग सोनालीच्या घरातील लोकांनी सोनालीला विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये कम्प्लेंट दाखल केली. पोलिसांनी रूपेश आणि त्याच्या वडिलांना दोघांनाही ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध सत्र न्यायालयात केस दाखल केली. केस चालू असेपर्यंत ते दोघे तुरुंगात होते. पण रूपेश अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आले. पण सत्र न्यायालयाने रूपेशच्या वडिलांना मात्र शिक्षा सुनावली; परंतु गावामध्ये रूपेशचे कुटुंबीय सोनालीच्या कुटुंबाला धमक्या देत होते. “रूपेशचे वडील बाहेर आल्यानंतर तुमच्या कुटुंबाची खैर नाही” असे सांगत होते. शेजारी असल्यामुळे त्यांचा नाहक त्रास सोनालीच्या कुटुंबाला सहन करावा लागत होता.
रूपेश याच्या वडिलांनी बेल मिळण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण सत्र न्यायालयात त्यांना बेल मिळणार नाही म्हणून पुढील कोर्टात त्यांनी अपील केली होती. हे सोनालीच्या कुटुंबाला समजताच त्यांनी रूपेशच्या वडिलांचे अपील मंजूर होऊ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध लढण्याची तयारी दाखवली होती. कारण रूपेशचे वडील बाहेर आल्यानंतर त्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागणार होता आणि जर त्यांना बेल मिळाली, तर गावात त्यांची दादागिरी अजून चालू झाली असती.
मुलीने प्रेमात पडून चूक केली. पण त्याचा सर्व त्रास नाहक तिचे कुटुंबीय अजून सहन करत आहेत. गावात इज्जत तर गेलीच, पण कोर्टात केस गेल्यानंतर त्यांचा वेळ आणि पैसाही गेला. ज्यावेळी सोनालीला घरातील लोक समजावत होते. त्यावेळी ती ऐकली नाही आणि प्रेमात आंधळे पडून आपल्या आयुष्याची बरबादी तर केलीच नि त्यामुळे तिच्या कुटुंबाला मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
(सत्यघटनेवर आधारित)