Saturday, April 26, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमुलांचे लेबलिंग...!

मुलांचे लेबलिंग…!

  • आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू

सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारचं लेबलिंग अयोग्य ठरतं. आपलं लेबलिंग होतंय हे समजणं, मुलांच्या मनावर अतिशय खोलवर परिणाम करतं. आपण असे आहोत, हे ऐकतच ते मोठे होतात. नि लेबल्स मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक न भरून निघणारं नुकसान करत असतात. त्यांच्याविषयी लावलेलं लेबल, ठेवलेली नावं ती कधी चटकन विसरू शकत नाहीत.

तुम्ही आपल्या मुलांना लेबलिंग तर करत नाही आहात ना?
‘Labels are for jars and not for children’
बऱ्याचदा मोठी माणसं, पालक आपल्या किंवा इतरांच्या मुलांना ती लाजाळू आहे, तो दादागिरी करतो, तो ना प्रयत्नच करत नाही, ती लीडर आहे, तो बॉर्न आर्टिस्ट आहे, अशा प्रकारचं लेबलिंग करत असतात. समाजात अन्न, कपडे, औषधं, भाज्या, वस्तू यांना लेबल असतं पण वय, लिंग, धर्म, जात, व्यवसाय, व्यक्तिमत्त्व पाहून जेव्हा नावं ठेवली जातात, तेव्हा ते किती वेदना देणारं असतं याचा विचार मुलांबाबत तर खूप आवश्यक आहे.

आपलं लेबलिंग होतंय हे समजणं, मुलांच्या मनावर अतिशय खोलवर परिणाम करतं. त्यांच्यावर या गोष्टी प्रचंड दडपण आणतात. आपण असे आहोत, हे ऐकतच ते मोठे होतात. खरं म्हणजे ते इतकं ऐकून घेतात की त्यांना एक्स्ट्राऑर्डिनरी लिसनरच म्हणायला हवं. या लेबलिंगचा स्वतःकडे एक व्यक्ती म्हणून पाहतानाही मुलांवर खूप परिणाम होत असतो याचा साधा विचारही आपण करत नाही.

१९६३ साली हॉवर्ड बेकर यांनी लेबलिंग थिअरीचा अभ्यास मांडला. माणसांवर निगेटिव्ह लेबलिंगचा होणारा परिणाम यावर त्यांनी भाष्य केलेय. मोठ्यांना जर लेबलिंगचा इतका त्रास होत असेल, तर लहानगी मुलं किती संवेदनशील असतात याकडे आपण दुर्लक्ष कसं बरं करू शकतो? आपण मोठी माणसं किती सहजपणे, जराही जाणीव करून न घेता, विचार न करता मुलांच्या चारित्र्याबद्दल, वागण्याबद्दल, ॲपियरन्सबाबत लेबलिंग करत असतो. असं पाहा की, एखाद्या प्रसंगात मुलं भांडली, रडली, मारामाऱ्या केल्या, लाजली, हट्टी बनली की लगेच शिक्के मारायलाच हवेत का? मुलं त्यांच्या पद्धतीने त्यांच्या क्षमतांनुसार वाढतात, विकसित होतात. आपण त्यांचं मन दुखावलं जाईल, जखमा होतील असं लेबलिंग करून त्यांच्याशी वागणं अजिबातच योग्य नाही.

असे लेबलिंग करण्यातले धोके समजावून घेतले पाहिजेत :
१) मुलांना नावे ठेवली की, ती स्वतःला तसं समजायला लागतात. स्वतःबद्दल तसा विचार करतात. कारण जेव्हा मुलांना एखादं विशेषण लावलं जातं तेव्हा ते लेबल त्यांच्या आयडेंटिटीचा एक भाग बनतं. ती एक नको असलेली ओळख बनते. लेबल्स मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक न भरून निघणारं नुकसान करत असतात. त्यांच्याविषयी लावलेलं लेबल, ठेवलेली नावं ती कधी चटकन विसरू शकत नाहीत. जणू मनावर एक ओरखडा उमटून जातो.

२) एकीकडे लेबलिंग मुलांच्या मनावर, तर परिणाम करतंच. पण दुसरीकडे रोजचे रोज त्यांनी कसं वागावं, काय करावं, आपल्याकडून काय अपेक्षा केल्या जातात, याचा संबंधही ते या विशेषणांशी जोडतात. एकदा का एखादा शिक्का मुलावर बसला की मग घरात, मित्र परिवारात, समाजात त्याला वागणूकही तशीच दिली जाते. उदाहरणार्थ एखाद्या जिद्दी मुलाला तापदायक म्हटलं की, बघण्याचा दृष्टिकोनही तसाच होतो. पालकही प्राॅब्लेमवर लक्ष केंद्रित करतात. उपायाचा शोध घेणं हे विसरून जातात. प्रयत्न, शक्ती खर्च होते ती त्याच्याबद्दल तक्रार करण्यात!

१९६५ चे संशोधन सांगते की, सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारचं लेबलिंग अयोग्य ठरतं. कारण, नकारात्मक लेबलिंग तर मुलांचं नुकसान करतंच पण सकारात्मक लेबलिंगनेही काही वेळेला मुलं स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करतात. त्यामुळे शेफारून जाण्याचा धोका त्यातही असतोच.

३) मुलांवर शिक्के मारले की, त्यांच्या पोटेन्शियल अर्थात जन्मजात गुणवत्ता, क्षमतेलाही मर्यादा पडतात. लाजाळू, दयाळू, समजूतदार, क्रिएटिव्ह, सृजनशील, ॲथलेटिक या सकारात्मक लेबलिंगनेही त्यांच्या वागण्यावर, करण्यावर अपेक्षांचं ओझं राहतं. काही वेळेस मुलांना वेगळं करायचं असतं. पण त्यांच्यावर लागलेल्या लेबलमुळे ते तसं वागू शकत नाहीत. “कंटाळा आलाय या समजूतदारपणाचा” असंही ते बोलून दाखवतात. खरं म्हणजे मुलं आयुष्यभर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीत, ॲक्टिव्हिटीजमध्ये रस घेतात, त्यामध्ये नवं काही शोधून काढतात. म्हणून विशिष्ट प्रकारच्या चौकटीत त्यांना अडकवून ठेवणं हे उचित नाही. आपण कोणतीही गोष्ट करू शकतो, हा विश्वास जेव्हा मुलं शिकतात, तेव्हा ते अधिक रिस्क घेतात. कठोर परिश्रम करायला तयार होतात अगदी मनापासून.

मग काही व्यक्तच व्हायचं नाही का मुलांबाबत?? असं नाही पण योग्य शब्दांची निवड करणं तर शक्यच आहे नं?
मुलांना विशेषणं लावली की, त्यांच्या स्वत्वाच्या जाणिवेवर त्याचा परिणाम होतो. एकदा का त्यांना विशिष्ट नाव पडले की, ते नाव त्याचा पिच्छा सोडत नाही. या खरं तर आपल्या मोठ्या माणसांच्या चुकीच्या सवयी आहेत, खोडी आहेत. पण कोणतीही चुकीची गोष्ट दुरुस्त करता येते. त्याबद्दल विचार करणं, त्याची जाणीव होणं याला अजून उशीर नक्कीच झाला नाही. आपल्याकडून अशी चुकीची लेबल्स मुलांना लावली जाऊ नयेत, यासाठी शब्दांचा वापर सजगपणे आणि जाणीव ठेवून करायला हवा. बोलण्यापूर्वी विचार व्हायला हवा. तुमच्या शब्दांच्या उपयोगातून तुमची समज दिसू देत. मुलांना आता आणि पुढेही आयुष्य जगायचंय. त्यांना प्रोत्साहन आणि आधार वाटेल असेच शब्द मुलांबाबत वापरायचे आहेत हे विसरू नका. “तो दयाळू मुलगा, ती मदत करणारी, तू लाजाळू आहेस किंवा लाजू नकोस, ती फार चोखंदळ आहे” असं म्हणण्याऐवजी “तो दयाळूपणे वागू शकतो, ती मदत करू शकते, नवीन माणसांशी बोलायला, रुळायला थोडा वेळ लागेल हरकत नाही, ठीक आहे, या वेळी तुला नसेल आवडलं काही”, असंही म्हणता येईल. यामुळे ती मुलं दयाळुपणाने वागण्याचा विचार करतील, मदत करण्याचा प्रयत्न करतील. पण हे करायलाच हवं असं ओझं त्यांच्या मनावर राहणार नाही. विशेषणांचा वापर करण्याऐवजी वर्णनात्मक वाक्यातून सकारात्मक असं बोलायला हवं.

लक्षात ठेवा, When we choose to label, we have chosen not to understand, and where the labels fly the critical thinking has ceased.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -