Friday, May 9, 2025

कोलाजसाप्ताहिक

Konkan Temple : टेरवचे कुलस्वामीनी भवानी - वाघजाई मंदिर

Konkan Temple : टेरवचे कुलस्वामीनी भवानी - वाघजाई मंदिर

  • कोकणी बाणा : सतीश पाटणकर



देवराईतील वाघजाई म्हणजे वाघापासून संरक्षण करणारी देवता. एक जागृत देवता असून तिला व्याघ्रेश्वरी किंवा व्याघ्राम्बरी असेही म्हणतात. शिवाय वाग् जाई म्हणजे वाचा शक्ती थोडक्यात वाणीची देवता - सरस्वती. येथील लोकांची तिच्यावर नितांत श्रद्धा व विश्वास आहे.


कौलारू मंदिर, देखणी ग्रामदेवतेची मूर्ती असं काहीसं पारंपरिक चित्र कोकणातील प्रत्येक मंदिराबद्दल प्रत्येकाच्या मनात असते. चिपळूण तालुक्यातील टेरव येथील पूर्ण काँक्रीटचे संगमरवरी, पण तरीही लाल- तांबड्या मातीतील खरे वैभव असणारे टेरवचे श्री भवानी वाघजाई मंदिर. भवानी मातेवर येथील स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांची श्रद्धा आहे. निसर्गरम्य परिसर आणि भवानी-वाघजाईच्या लौकिकामुळे जिल्ह्यासह राज्यातील भाविकही दर्शनासाठी येत असतात. चिपळूणपासून सात किमीवर वसलेलं टेरव गावातील श्री कुलस्वामीनी भवानी-वाघजाई मंदिरास साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे.



मंदिराची बांधणी म्हणजे अस्सल कोकणच्या लाल- तांबड्या मातीतील वास्तुशिल्पाचा नमुना. पूर्वी टेरव ग्रामस्थांचं भवानी आणि वाघजाई मंदिर हे देवरहाटीत होते. स्थानिक ग्रामस्थ आणि अनेक देणगीदारांच्या योगदानातून मंदिराचा जीर्णोद्धार झाला. यातून एक भव्य देखणं वास्तुशिल्प उभे राहिले. मंदिराचे बांधकाम नवे असले तरी परशुराम भूमीतील या भवानी मातेचा इतिहास तुळजापूरच्या भवानीशी नाते सांगणारा आहे. देवराईतील वाघजाई म्हणजे वाघापासून संरक्षण करणारी देवता. वेद काळात हा अर्थ थोडा बदलला आणि वाघावर बसून दुष्टांचा संहार करणारी स्त्री देवता ती वाघजाई. काही संस्कृत कोशांमध्ये वाघजाई हा शब्द वागजाई यावरून आलेला आहे असे आढळते. ‘वागजाई देवी म्हणे तू वाग् वाणी’. वाग् जाई म्हणजे वाचा शक्ती थोडक्यात वाणीची देवता - सरस्वती.



दोन हजार भाविक एकाच वेळी बसतील अशा विशाल सभामंडपाचे हे दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर आहे. मंदिराला प्रत्येकी ४० फूट उंचीचे दोन मोठे दरवाजे आहेत. त्याच्या आजूबाजूला विविध सुंदर मूर्तीही आहेत. या मंदिराच्या संपूर्ण बांधकामावर नक्षीदार कोरीव काम, वीणाधारी स्त्री, मृदंगधारी वादक, नृत्य अप्सरा, ध्यानस्थ देवी, गवाक्षावर मोर, कपोत, हंस, विष्णूच्या दशावतारी चित्रांची कोरीव शिल्पे मनाला भुरळ घालणारी आहेत. भवानी देवीची मुख्य मूर्ती ९ फूट उंच असून ती काळ्या पाषाणापासून बनलेली आहे. देवीच्या हातात महिषासुराचा वध दर्शवणारी विविध शस्त्रे आहेत. हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे जिथे नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्वतीच्या सर्व नऊ रूपांच्या मूर्तीचे दर्शन घडून येते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री. निसर्गरम्य परिसर आणि भवानी-वाघजाईच्या लौकिकामुळे जिल्ह्यासह राज्यातील भाविकही दर्शनासाठी येत असतात.


मंदिर परिसरात भवानी - वाघजाई सोबत अन्यही देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात सात पुष्पवाटिका, अर्धवर्तुळाकार उद्यान, देवराईच्या हिरवाईमुळे प्रसन्नतेत भर पडते. टेरव गावची जागृत ग्रामदैवत आहे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. एक वरदहस्त असून एक जागृत देवता आहे. तिला व्याघ्रेश्वरी किंवा व्याघ्राम्बरी असेही म्हणतात. चिपळूण तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ व जंगलमय आहे. त्यामुळे इथे वाघांचा त्रास अधूनमधून जाणवायचा. बहुसंख्य लोक शेतकरी असल्यामुळे वाघापासून आपले व आपल्या गुरा-वासरांचे संरक्षण व्हावे आणि ते आई वाघजाईच करू शकते, अशी लोकांची धारणा असून तिच्यावर नितांत श्रद्धा व विश्वास आहे.



मंदिराच्या चारही गाभाऱ्यांवर दाक्षिणात्य घाटाचे गोलाकार कळस आहेत. मंदिराला दोन महाद्वारे आहेत. या मंदिराच्या संपूर्ण बांधकामावर नक्षीदार कोरीव काम, वीणाधारी स्त्री, मृदंगधारी वादक, नृत्य अप्सरा, ध्यानस्थ देवी, गवाक्षावर मोर, कपोत, हंस, विष्णूच्या दशावतारी चित्रांची कोरीव शिल्पे मनाला भुरळ घालणारी आहेत. हाती आयुध असलेली, महिषासुराचा वध करणारी तुळजाभवानीची मूर्ती काळ्या निलम पाषाणातील असून उडपी येथून बनवून घेतली आहे.



(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Comments
Add Comment