Monday, July 22, 2024

सुवेळ?

  • नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड

थोडीशी सीनिऑरिटी किती अधिकार देते ना? सुषमा आता ‘अधिकारी’ झाली होती. थोडा विचार करून सुषमा म्हणाली, “मीरे, पोळ्याला बाई ही संकल्पना जुनी झाली आता. तू ‘कूक’च ठेव घरात. आपण आधीच शोधून ठेवू. म्हणजे लागलीच ‘कार्यरत’ करता येईल.

रुसवे फुगवे काढायची बेस्ट वेळ कोणती?” मीरानं सुषमाला विचारलं.
“कोणती? सांग ना तू.”
“मी?” सुषमानं प्रश्न केला.
“हो गं. तुझं लग्न थोडंसं सीनिअर आहे नं! तुझा अधिकार मोठा. सांग नं गं कोणती ती सुवेळ?” मीरा आता अधिर झाली होती.
“बिछाना.”
“बिछाना? तिथे तर प्रणयाची घाई होते. प्रेमाची गोष्ट सुरू होते.”
“येस गं. तीच ती सुवेळ! नवरा हातघाईवर आलेला असतो नि लाडे लाडे त्याला वाट्टेल तसा गुंडाळत येतो.”
“खरं गं! तू पोळ्याला बाई पहिल्या रात्रीच मागितलीस ना? जेहेत्ते कालाचे ठायी सुखी झालीस ना?”
“टॉप प्रायॉरिटीची गोष्ट पहिल्या रात्रीच मागावी नि जन्मभराचे सुख पदरी पाडून घ्यावे.”
“हुशार आहेस.”
“तू पण हुशारीने टॉप वाटणारी गोष्ट मागून घे.”
“उदाहरणार्थ?”
“पोळ्याची बाई, स्वयंपाकीण, जेवणाचा डबा, रविवारचे बाहेरचे जेवण यापैकी अग्रक्रमाने हवी असणारी कोणतीही गोष्ट.”
“हे मी करीन. मामीकडे पोळ्या लाटलाटून माझ्या हाताच्या सुरनळ्या झाल्यायत. एक नै, दोन नै… पंधरा पोळ्या गं!”
“तुला मी शक्य असतं तर… तर नोबेल प्राईज दिलं असतं गं सखी.” मीरा कौतुकानं म्हणाली.
सुषमा परत उत्साहात आली. थोडीशी सीनिऑरिटी किती अधिकार देते ना? सुषमा आता ‘अधिकारी’ झाली होती. थोडा विचार करून सुषमा म्हणाली, “मीरे, पोळ्याला बाई ही संकल्पना जुनी झाली आता. तू ‘कूक’च ठेव घरात. आपण आधीच शोधून ठेवू. म्हणजे लागलीच ‘कार्यरत’ करता येईल.”
“अगं पण सासू?”
“तिला क्षणभर दूर ठेवूया. कसं झालं तरी तुझ्या नवऱ्याची ती आई! तिला दुखवणं म्हणजे छलकपट मोहीम! तसं त्याला अज्जिबात वाटता कामा नये बरं!
अत्यंत जोखमीने प्रेमाचा तास सुरू होण्याअगोदर या
गोष्टी करायच्या.”
“जमेल मला. मी खूप विचार करून ठेवलाय या गोष्टीवर.”
“मग छानच. जम्या तो जम्या. नही जम्या तो? तो पायजम्या.”
“म्हणजे?”
“पायजम्यास उतरवायचे नाही.” “समझी तू?”
“जी. सौ टका समझी.” दोघी सख्यांनी एकमेकींस टाळी दिली अत्यंत आनंदाने.
आणि ती ‘सुवेळ’ उगवली.
मीरा सासरघरी आली. मीराने हट्ट केला नाही, मधुचंद्राला इथे जाऊ, तिथे जाऊ! ती फक्त सासूबद्दल नवऱ्यापाशी बोलली,
“तुमची आई दोन दिवस माई मावशींकडे पाठवता येईल का? हॉटेलचा पण खर्च वाचेल. नि आपणास प्रायव्हसी मिळेल.”
“किती डोकेबाज आहेस गं तू!” नवरा खुशीने म्हणाला. त्याला प्रणयाची घाई झाली होती. ‘पागल’ होण्याचे वय ना!
“आई…”
“अरे मुलांनो, मी माईकडे चार दिवस राहायला जाते.” टुणकन् उडी मारावी इतका आनंद मुलांना झाला.
“अगं कशाला?”
“तुम्हाला एकांत मिळावा म्हणून रे.”
“एवढं त्या म्हणतायत तर… जाऊ देत ना चार-आठ दिवस माईमावशींकडे.” बायको नवऱ्याला म्हणाली.
माईमावशीकडे एकदाची सासू रिक्षाने गेली. मीरा जामेजाम खूश झाली. नवऱ्याने गच्च मिठीत घेतली. त्याला तिने उत्तम प्रतिसाद दिला.
“आता कुण्णी नाही त्रास द्यायला. नजरकैदेत ठेवायला.”
मीरा म्हणाली.
“आता मला तू नि तुला मी! येगं घट्ट जवळ अग्गदी जवळ.”
“मला भूक लागलीय.”
“बाहेर जेवण करूया? उत्तम रेस्टॉरंटमध्ये?”
“नको. वाचवूया पैसे. आईने अनारसे दिलेत, चकल्या दिल्यात
त्या खाऊयात. बाहेर एक भाजी मागवा. मी कुकर लावते. आता
वीस मिनिटांत साधं वरण-भात होईल. पोळ्या आजच्या दिवस
बाहेरून मागवूया.”
नवऱ्याचे काय? हो हो हो होच होते. बायको वाक्यम् प्रमाणम्.
सारे तसेच नवऱ्याने केले. पोळ्या मागवल्या. भाजी मागवली. स्वत:चं डोकं वापरून गुलाबजामही मागवले. लग्नाची पहिली पंगत. राजा राणी ट्रॅव्हल. ती जामेजाम खूश होती. घास भरवूया नवऱ्याला. त्याच्याकडून भरवून घेऊ आपल्याही मुखात. लई भारी! ती सुसाट सुटली. मुखात घास घालणार यवढ्यांत दरवाजाची बेल वाजली.
“कोण कडमडलं आता?”
“तिनं त्रस्त होत दरवाजा उघडला. दारात सासू उभी!
“हे काय?”
“माईला उलट्या सुरू झाल्या रे मुला. मला चक्करच
आली ते बघून.”
“अरे बापरे! माईमावशी कुठाय?”
“सिटी हॉस्पिटलला एंट्री केली नि सरळ निघून आले. तू जा आता. सॉरी हं सुने…” बिच्चारी सून. हीच का ती सुवेळ? प्रश्न करीत राहिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -