Friday, May 9, 2025

किलबिलसाप्ताहिक

Fuel gas : इंधन वायू

Fuel gas : इंधन वायू

  • कथा : प्रा. देवबा पाटील



कार्बनचा एक व हायड्रोजनचे चार अणू मिळून मिथेन तयार होतो. तसेच दलदलीमध्ये प्राणी व वनस्पती यांच्या कुजण्यातूनही तसेच शेण-कचऱ्याचे अपघटन होऊन त्यातूनही मिथेन निर्माण होतो. तो दगडी कोळशात कोंडलेला असतो. खाणकाम करताना त्यातून तो बाहेर पडतो. तो खाणीतील उष्णता खूप वाढवतो म्हणून खूप घातक असतो.



देशमुख सरांचे आठवीच्या विद्यार्थ्यांना “आपल्या पृथ्वीचे वातावरण” प्रकरण शिकवणे सुरू झाले.



“सर मी असे वाचले आहे की पृथ्वी वायुरूपात असताना त्या तप्त वायंूच्या गोळ्यात मिथेन वायूसुद्धा होता. हे खरे आहे का?” कुंदाने विचारले.



सर म्हणाले, “पृथ्वीच्या प्रारंभी अमोनिया, मिथेन, हेलियम व वाफ असावी. यांवर सूर्याच्या अतिनील किरणांचा परिणाम होऊन त्यांपासून नवीन वायू तयार झालेत. जसे अतिनील किरणांमुळे अमोनियाचे विघटन होऊन हायड्रोजन व नायट्रोजन तयार झाले, तर मिथेनचे विघटन कार्बनमध्ये झाले अन् वाफेचे विघटन होऊन ऑक्सिजन निर्माण झाला असावा, असे शास्त्रज्ञ म्हणतात.”



“हा मिथेन वायू कसा तयार होतो सर?” वृंदाने प्रश्न केला.



“कर्ब नि उद्जन म्हणजे कार्बन व हायड्रोजन यांच्या संयोगातून मिथेन वायू तयार होतो.” सर सांगू लागले, “कार्बनचा एक व हायड्रोजनचे चार अणू मिळून मिथेन तयार होतो. तसेच दलदलीमध्ये प्राणी व वनस्पती यांच्या कुजण्यातूनही मिथेन तयार होतो. शेण-कचऱ्याचे अपघटन होऊन त्यातूनही मिथेन निर्माण होतो. तो दगडी कोळशात कोंडलेला असतो. खाणकाम करताना त्यातून तो बाहेर पडतो. तो खाणीतील उष्णता खूप वाढवतो म्हणून खूप घातक असतो. त्यामुळे कोळशाच्या खाणीत तो जास्त निर्माण झाल्यास खाणीत काम करणाऱ्या कामगारांना धोका संभवतो.”



“त्याची वैशिष्ट्ये काय आहेत सर?” नरेंद्राने माहिती विचारली.



“तो हवेहून हलका असून रंगहीन, गंधहीन व रुचिहीन आहे. तो जरी ज्वलनास मदत करीत नसला तरी हवेसोबत मात्र तो जळतो. म्हणूनच स्वयंपाकघरात त्याचा इंधन म्हणून उपयोग करतात.” सरांनी सांगितले.



“त्याचे इतर आणखी काही उपयोग व दुष्परिणाम आहेत का सर?” वीरेंद्राने शंका काढली.



“हो.” सर म्हणाले, “तो कापडांच्या व पेट्रोलच्या उद्योगात तसेच कागद निर्मितीत वापरतात. तो हरितगृहातून व पेट्रोल इंधनातून बाहेर पडतो; परंतु तो हवेची उष्णता खूप वाढवतो म्हणून तो अतिशय घातक ठरतो.”



“मग आता इतर एखाद्या ग्रहावर तो आहे काय सर?” मंदाने आपल्या डोक्यातील खूळ काढले.



“होय.” सर बोलले, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून या ग्रहांवर तो भरपूर प्रमाणात आहे. युरेनसवर तर तो इतका जास्त आहे की त्याच्यामुळेच युरेनस हिरवा दिसतो.”



“सर आपल्या घरात शेगडीसाठी कोणता वायू वापरतात?” नंदाने आपली चौकस बुद्धी दाखवली. “आपल्या स्वयंपाकघरातील इंधनाचा वायू हा द्रव पेट्रोलियम असतो. त्यात ब्युटेन, प्रोपेन व हायड्रोकार्बनचे रासायनिक मिश्रण असते.”



सर म्हणाले “तो त्या वायूच्या टाकीत कसा काय बसवतात सर? कारण, वायू तर व्यापक जागेत पसरणारे असतात.” योगेंद्राने आपली अक्कल पाजळली.



“मूळ वायूचा आकार खूप मोठा असतो. त्यामुळे त्याला टाकीत बसवण्यासाठी त्याचे द्रवात रूपांतर करतात. द्रवात रूपांतर केले म्हणजे मग त्याचा आकार खूप लहान होतो नि खूप मोठा वायू छोट्याशा टाकीत अगदी सहज मावतो.” सरांनी खुलासा केला. “मग तो द्रव पुन्हा वायू होऊन शेगडीतून कसा बाहेर येतो सर?” जयेंद्राने गुगली टाकली.



“टाकीच्या तोंडावर एक नियंत्रक बसवलेले असते. त्या नियंत्रकात एक विशिष्ट प्रकारची झडप बसवलेली असते. कळ फिरवून नियंत्रक सुरू करताबरोबर त्यातून द्रव वायू बाहेर येतो. झडपेने त्याचा दाब कमी होतो व त्याचे पुन्हा वायुरूपात रूपांतर होते. नियंत्रकाच्या तोटीतून तो सुरक्षित रबरी नळीच्या साहाय्याने शेगडीत पोहोचतो. हा वायू अत्यंत ज्वालाग्राही असतो. हवेतील प्राणवायूसोबत तो ताबडतोब पेट घेतो. त्यामुळे तो शेगडीच्या ज्वालकातून बाहेर येताबरोबर आगकाडीने किंवा लायटरच्या म्हणजे अग्निकांडीच्या अग्नीच्या ठिणगीने त्वरित पेट घेतो.” सरांनी स्पष्टिकरण दिले.



“त्याचा वास खूप खराब येतो सर.” प्रियवंदा नाक मुरडत म्हणाली.



“नाही, त्याला वासच नसतो.” सर सांगू लागले, “मी आधीच तुम्हाला सांगितले आहे की, तो मूळचा रंगहीन व वासहीन आहे; परंतु टाकीतून वा शेगडीतून त्याची चुकूनही गळती झाल्यास ती खूप घातक ठरते. म्हणून त्याची गळती ओळखू येण्यासाठी त्यात द्रवात रूपांतर करतांना एक विशिष्टसे तीव्र वासाचे रसायन मिसळलेले असते. त्यामुळे त्याला तीव्र वास येतो व त्याची वायू टाकीतून वा शेगडीतून घरात गळती झाल्यास चटकन माहीत पडते.”



“म्हणूनच त्यापासून खूप काळजी घावी लागते ना सर?” सुनंदा म्हणाली.



“हो तो अतिशय ज्वलनशील असल्याने त्यापासून विजेची साधने व कोणतेही अग्निजन्य पदार्थ दूरच ठेवावेत. तसेच भ्रमणध्वनीसुद्धा त्यापासून दूर ठेवावा. शेगडी सुरू असताना शेगडीजवळ मोबाइलवर मुळीच बोलू नये, काहीच बघू नये वा कानांना कर्णफोन वा कर्णध्वनी लावून ऐकूसुद्धा नये. तसेच आठवणीने वायू टाकीचे नियंत्रक सदैव बंद ठेवावे आणि शेगडीची कळसुद्धा सतत बंद ठेवावी. प्रत्येकाने प्रत्येक वेळी ही काळजी जरूर घ्यावी. त्याबाबतीत मुळीच दुर्लक्ष करू नये.” सरांनी खुलासेवार सांगितले नि तास संपल्याची घंटी वाजली.

Comments
Add Comment