Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजजिद्द... ‘नवसंजीवनी’...

जिद्द… ‘नवसंजीवनी’…

  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

म्हणतात ना जिद्द जिवंत असेल, तर माणूस जीवनाचा स्वर्ग बनवू शकतो. हेच नंदनवन. माणूस निश्चयाच्या बळाने ध्येयाप्रत पोहोचतो. त्यासाठी लागतं मन, मनगट, मनका आणि मस्तीष्क. सेल्फ लव्ह, जाणीव, स्व-प्रतिमा, स्वयंविश्वास, अभिमान इत्यादी गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्वजाणीव असली पाहिजे. “दुनिया की छोडो, पहले उसे खूश रखो जिसे आप हर रोज आईने मे देखते हो. औरोंको खूश रखते रखते आपने उसका दिल बार बार दुखाया हैं.” यासाठी एकदा आपण स्वतःची कृतज्ञता मानूया. आपली बलस्थाने ओळखूया आणि पुढे जाऊया.

आपल्या विचारांच्या सकारात्मकतेला सलाम. लहानपणी एक छोटी गोष्ट वाचण्यात आली होती थॉमस अल्वा एडिसन यांची. शाळेतून एक चिठ्ठी लिहून त्यांच्या शिक्षिकेने त्यांना घरी पाठवलं ते कायमचं. ती चिठ्ठी वाचून आईने त्यांना मिठी मारली आणि ती चिठ्ठी तशीच कपाटात ठेवून दिली. “काय लिहिलं असेल?” आईला एडिसनने विचारलं. आई म्हणाली, “तुमचा मुलगा फार विद्वान व प्रगल्भ आहे. त्याची बौद्धिक पातळी उंचीची असल्याने आमच्या शिक्षकांकडे ती कुवत नाही. त्याला घरीच ठेवा. शाळेत पाठवू नका इतकंच.” त्या दिवसापासून आईने त्यांना शिकवायला सुरुवात केली. तो फार मोठा शास्त्रज्ञ झाला आणि एक दिवस कपाट आवरताना त्याला ही चिठ्ठी सापडली आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा पाट वाहू लागला. चिठ्ठीत लिहिलं होतं की, “तुमचा मुलगा मंदबुद्धीचा असल्याने इतर मुलांबरोबर आम्हाला त्याला शिकवणे खूप अवघड आहे. त्याला शाळेत न पाठवता घरी शिकवा. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचा खूप वेळ वाया जातो.” एडिसनच्या आईने त्या मुलाला सकारात्मक दृष्टीने घडविले आणि तो थोर शास्त्रज्ञ झाला. हा तोच विजेचा शोध लावणारा थॉमस अल्वा एडिसन. त्याच्या आईने मात्र त्याला घडवताना कळूच दिले नाही की, त्या चिठ्ठीत काय आहे…

तशीच एक गोष्ट आहे हेलन केलर यांची. ज्यांना स्वतःला दिसत नसतानाही स्वतः अंध, मुक्या असताना त्यांनी अंधत्वावर मात करून आपली नजर फक्त प्रकाशाकडेच ठेवा म्हणजे तुम्हाला अंधार कधीच दिसणार नाही! एक अंध व्यक्ती असून इतर अंध व्यक्तींचा आदर्श हेलन केलर होत्या. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की, एक लहान मूल आपल्या वडिलांच्या अंतयात्रेतखूप रडत होते. प्रेताला दफन करण्यात आले. त्याची आई म्हणाली, “अरे बाबा गेले. तू का रडतोयस?” त्याने सांगितलं की, “दफन करताना एक बेडकाचं छोटं हिरव्या रंगाचे पिल्लू त्याच्यात दफन केलं गेलं आणि ते जिवंत होतं!!” पुढे हाच मुलगा मॅक्झिम गॉर्की “आई” या कादंबरीचा निष्णात लेखक झाला… ही संवेदनशीलता आणि भूतदया त्याच्या ठाई होती.

एक सुंदरशी गोष्ट आहे मनाला चटका लावून जाणारी. कुठलासा डेंग्यू ताप येतो आणि अचानक क्रूर नियतीच्या जाळ्याने एका सुंदर जादुई आवाजाच्या कलाकार सुप्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक यांची दृष्टी या तापाने जाते. पण ओंजळीतली फुलं अधिकाधिक सुगंधी बनविण्यासाठी त्यांनी आपल्या मनाचे दार उघडले आणि प्रकाश व्यापून टाकला. डोळ्यांनी प्रकाश वेचता येत नाही म्हणून काय झालं? मनाच्या दृष्टीने हृदयाच्या दारांनी प्रकाश निर्माण केला आणि तो आपल्या शब्दांनी आणि जादूच्या आवाजाने सर्वांना या प्रकाशात न्हाऊ घातलं!! असं म्हटलंय डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात. स्पर्श हे शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने दिलासा देऊ शकतात. पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले, तर ते डोळ्यांना ओलावून हृदयाला स्पर्श करू शकतात, असेच काहीसे यातून घडले.

आयुष्य म्हटले की सरळमार्गी कधीच नसतं. अडचणी, आव्हाने, संकटे, समस्या, कटकटी आल्याच. आपल्या आयुष्यातील अवघड कठीण आव्हानात्मक प्रसंगांचा आपण धीराने केलेल्या सामना आणि विपरित परिस्थितीवर केलेली मात यातून खरंच खूप महत्त्वाचं शिकणं, धडा घेणं आणि आयुष्यात काहीतरी मिळवलं. आपल्या अवतीभोवती स्पीड ब्रेकर येतात, पण थांबायचं का? नाही! तर चालत पुढे पुढे जायला हवं!! समस्येला मोठे करायचं की, रस्त्यातले काटे बाजूला करायचे! म्हणून आनंदाने चालत राहायचं, आनंद वेचत राहायचं, समस्यांचा बाऊ करू नका, रडगाणी सोडा. ज‘गावं’ यातील जे गाव आहे, जगण्यातच गावं आहे म्हणजे ते जगण्याचं गाणं…

लक्षात ठेवा, स्वतःला शक्तीही आपणच देतो. जे आपल्यात आहे, तेच बाहेर नेतं. जसं फुगा फुगवल्यानंतर त्यातील हवाच त्याला उंच उडत नेते, हीच माणसाची क्षमता, विचार, कल्पनाशक्ती अचाट आणि अफाट आहे, अमर्याद आहे. फक्त इतकेच ती कुठे वापरायला हवी हे आपल्याला समजायला हवं! हिंदी जगतसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना सुधाचंद्रन अपघातात आपल्या एक पाय गमावल्याने कृत्रिम पाय असूनदेखील सुंदर नृत्य करतात हा आदर्श एका झुंजार कलाकाराचा अभिमानास्पद आहे. लांबच्या गोष्टीपेक्षा एखादा छोटासा विचार आयुष्य बदलायला लावतो, हेच खरं. यशाच्या शिखरावर कायम उभे राहायचं असेल, तर साहसी निर्भीड बिनधास्त बेधडक बनलं पाहिजे. आपल्या मनाला चिकटलेली चिंतेची काजळी, बैचेनी, अशांती, नाराजी, खंत, उद्विग्नता, नकारात्मकतेचे तृण उपटून, जळमटे काढून फेकून द्या आणि मोकळे व्हा आणि सांगा मनाला मला ध्येयप्रत पोहोचायचे. उज्ज्वल, उत्तुंग यश मिळवायचेय. अशी करावी समस्येवर मात.

अथेन्स शहरातील पाश्चात्त्य वक्ता डेमोस्थेनीस ज्याने उच्चार स्पष्ट नाही, वाणीदोष, आवाज किनरा यावर मात करण्यासाठी तोंडात गारगोट्या ठेवून ओरडायला सुरुवात केली, गीते पाठ केली, भाषणांचा सराव केला, समुद्राच्या लाटांसमोर भाषण केले, डोंगरावर पळण्याचा सराव केला आणि हिस्टरी ऑफ पेलोपनिशियन ऑर हा ग्रंथ आठ वेळा लिहून काढला, पुढे न्यूनगंडावर मात करत या वक्त्याने खूप प्रसिद्धी मिळविली. अशा प्रकारे समस्येवर मात करण्यासाठी ‘दुनिया का बोझ सारा दिल से उतार ले छोटीसी हैं जिंदगी हसके गुजार ले…’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -