मुंबई: वेस्ट इंडिजने इतिहासाची पुनरावृत्ती करताना ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात २७ वर्षांनी कसोटीत मात दिली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनच्या द गाबामध्ये खेळवण्यात आला. वेस्ट इंडिजने सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला ८ धावांनी हरवले. वेस्ट इंडिजकडून या मालिकेत पदार्पण करणाऱ्या शमर जोसेफने शेवटचा विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.
सामन्यातील चौथा आणि आपल्या दुसऱ्या डावात ९ विकेट गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला १ विकेट शिल्लक असताना विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती. मात्र वेस्ट इंडिजचा गोलंदाज शमर जोसेफने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवू दिला नाही. फलंदाजी करत असलेल्या जोश हेझलवूडला जोसेफने बोल्ड करत आपल्या संघाच्या खात्यात विजय टाकला.
२१६ धावांचे आव्हान पेलू शकली नाही ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडिजला आपल्या दुसऱ्या डावात १९३ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर २१६ धावांचे आव्हान ठेवले होते. दुसऱ्या डावादरम्यान फलंदाजी करताना शमर जोसेफच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर तो रिटायर बाद झाला होता आणि पाहुण्या वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आला होता.
त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उथरलेल्या ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी २०१७ धावांवर बाद केले. या दरम्यान संघाचा सलामीवीर स्टीव्ह स्मिथने ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ९१ धावांची खेळी केली. तर कॅमेरून ग्रीनने ४ चौकार लगावत ४२ धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे इतर फलंदाज अयशस्वी ठरले.