मुंबई: राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपले उपोषण सोडले आहे.
राज्य सरकारकडून मागण्या मान्य होताच मराठा आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जावे यासोबतच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जावेत अशी मागणी मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनातून केली होती.
हे आंदोलन आंतरवाली सराटी येथून सुरू करण्यात आले होते. सरकारकडे यासाठी वेळही मागण्यात आली होती. दोनदा वेळ वाढवून दिल्यावरही सरकारने कोणतेचे पाऊल उचलले नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन वाशीत येऊन धडकले होते.
राज्य सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध संपला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या आहे. आम्ही सरकारच्या पत्राचा स्वीकार करेन. मी शनिवारी म्हणजेच आज मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिईन.
मंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वातील एक प्रातिनिधिक मंडळ मनोज जरांगे यांना रात्री उशिरा भेटण्यासाठी पोहोचले होते. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्यांबाबत अध्यादेश काढण्यात आला. या अध्यादेशाची कॉपी मनोज जरांगे यांच्याकडे सोपवण्यात आली.