मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २५ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून यजमान भारतीय संघ पाहुण्या संघावर वरचढ दिसत आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवशी शानदार गोलंदाजी करताना इंग्लंडला २४६ धावांवर रोखले होते. यानंतर इंग्लंडचा संघ भारतीय फलंदाजांसमोर दीड दिवसांपासून संघर्ष करताना दिसत आहे. या सामन्याची सुरूवात होताच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. त्याने आपल्या नेतृत्वात एक लाजिरवाणा रेकॉर्ड केला.
२४६ धावांचे प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवशी ११९ धावा ठोकल्या होत्या. गोलंदाजीदरम्यान इंग्लंडच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्डची नोंद झाली. इंग्लंडने १४ ओव्हरच्या आधीच आपले तीन रिव्ह्यू गमावले. याच्यानतंर बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंड पहिला असा संघ बनला आहे ज्यांनी कसोटी सामन्यात सर्वात कमी षटकांत आपले तीन रिव्ह्यू गमावले. याआधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या नावावर होता. २०२०मध्ये इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिजने केवळ १६ ओव्हरमध्ये आपले तीन रिव्ह्यू गमावले होते.
भारताकडून तिघांची अर्धशतके
टीम इंडियाकडून या सामन्यात कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. टीम इंडियाकडून आतापर्यंत तीन खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केल्या आहेत. सलामीचा फलंदाज यशस्वी जायसवालने ८० धावांची खेळी केली. याशिवाय केएल राहुलने ८६ धावा ठोकल्या. यानंतर टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजानेही वाहत्या गंगेत हात धुतले. जडेजा ८१ धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ४२१ धावा केल्या होत्या.