Tuesday, July 1, 2025

मीरा भाईंदरमध्ये मराठ्यांचा गुलाल उधळत जल्लोष

मीरा भाईंदरमध्ये मराठ्यांचा गुलाल उधळत जल्लोष
मीरा रोड - मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून शुक्रवारी पहाटे अध्यादेश काढले. यामुळे मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळाल आहे.

सकल मराठा समाज, मिरा भाईंदर यांनी लढ्याला यश मिळाल्याबद्दल शनिवारी सायंकाळी ढोल ताश्याच्या तालात काशिमीरा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ एकत्र येऊन महाराजांना अभिवादन करत एकमेकांना पेढे वाटत , गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सराटी अंतरवाली येथून पायी चालत नवी मुंबई वाशी येथे पोहोचले. त्यावेळी सरकारने मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येऊ नये अशी विनंती केली. जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत शनिवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी - नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडली आहे.

एका सामान्य घरातला सुशिक्षित तरुण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर समाजकारणात-राजकारणात काय किमया घडवू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत असे मराठा समाजच्या वतीने सांगितले जात आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी सकल मराठा समाज , मीरा भाईंदर यांनीही काशी मीरा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >