मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात Adv. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांना अटक करण्याची मागणी केलीय. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलविरोधात हाक दिली आहे. त्यांनी अवाजवी टोल वसुलीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यभर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. विशेष म्हणजे पनवेल, वाशी, मुलुंड या टोलनाक्यांवर मनसैनिक ठाण मांडून आहेत.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक वाहनांना टोल न भरु देता सोडून दिलं. याच मुद्द्याच्या विरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सदावर्ते मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा अशी लेखी तक्रार त्यांनी केलीय. तसंच मुलुंड टोल नाका जाळल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
काय म्हणाले सदावर्ते?
‘हिंदू राष्ट्र भारत हमारा’ असं मानणारं आमचं संघटन आहे. मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू सगळ्यांसाठी महाराष्ट्र-मुंबई एकत्र नांदण्यासाठी आहे. पोलोचे खेळाडू कधीतरी बाहेर येऊन बोलतात.
महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही. डंके की चोट पे सांगत आहोत… काही झालं तर राज ठाकरेच जबाबदार आहेत.
तुम्ही पोलोचे खेळाडू असाल, पाहुणे कलाकारांसारखे येत असाल.. महाराष्ट्राला पाहुण्या कलाकारांची गरज नाही.