आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. तब्बल २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर १९५० मध्ये भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली आणि २६ जानेवारी १९५० रोजी या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानिमित्त दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तेव्हापासून या मार्गावर हा संचलन सोहळा सुरू झाला. या दिवशी भारताच्या विविधतेचे आणि संस्कृतीचे आणि लष्करी सामर्थ्यांचे प्रदर्शन केले जाते. यावर्षी स्वतंत्र भारताचा ७५ वा म्हणजेच अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. देशाचे राष्ट्रपती या कार्यक्रमात सहभागी होऊन ध्वजारोहण करतात. भारतीय प्रजासत्ताक दिनाची सर्व तयारी राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर झाली आहे. पहाटेच्या कडक्याच्या थंडीत ही तयारी करण्यात आली. या संचलनात देशाचे लष्करी सामर्थ्य, विविधतेचे, संस्कृतीचे आणि लष्करी सामर्थ्यांचे प्रदर्शन केले जाते. यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे.
या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन चित्ररथ संचलनात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित ‘भारत’ आणि ‘भारत लोकशाहीची जननी’ या दोन संकल्पनांवर आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने विविध राज्यांना कळविले होते. त्यास अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३५०वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री शिवराज्याभिषेकाचा ३५० वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून ‘लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी आहे. महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. नवी दिल्ली येथे साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शविण्यात आलेले आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण असते ते कर्तव्यपथावर होणारे लष्करी संचलन. या भव्य संचलन सोहळ्यात सशस्त्र दलांच्या क्षमतेचे प्रदर्शन घडवले जाते. त्यात भारतीय शस्त्रांचे प्रदर्शन, लष्करी क्षमता यांसह अनेक चित्तथरारक कवायती देखील सादर केल्या जातात. यावर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या वर्षी स्त्री शक्तीचे महत्त्व हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे. कर्तव्यपथ हा राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतचा मुख्य रस्ता आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात या मार्गावर अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. ब्रिटिशांनी १९११ मध्ये कोलकाता येथून राजधानी दिल्ली येथे हलवली. दिल्ली शहरातील मध्यवर्ती असलेल्या या रस्त्याला किंग्स वे या नावाने ओळखले जात असे. स्वातंत्र्यानंतर या मार्गाचे नाव राजपथ ठेवण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यावर या मार्गावर पहिल्यांदा संचलन करण्यात आले. दरम्यान, २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तेव्हापासून या मार्गावर हा संचलन सोहळा सुरू झाला. भारताच्या लोकशाहीचे, सार्वभौमतेचे हा सोहळा जणू प्रतीकच आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त, पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. विविध पदकांची सन्मान करण्यासाठीची संपूर्ण पदक व्यवस्था तर्कसंगत करण्यासह त्यात परिवर्तन करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना हे पदक दिले जाणार आहे. महाराष्ट्रातल्या ७८ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहेत. त्यामध्ये रश्मी करंदीकर यांचे नाव पहिले आहे. रश्मी करंदीकर या सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर कार्यरत आहेत.तसेच संजय जाधव, राजेश्वरी कोरी, रवींद्र चारदे, अरुण परिहार, अमित तिमांडे आणि योगेश जाधव या अन्य अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर देशभरातल्या एकूण ७५३ अधिकाऱ्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला आता १० वर्षे होत आली आहेत. या कालावधीत त्यांनी विविध लोकोपयोगी महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या. या योजनांचा फायदा अगदी तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यात सरकारला यश आले आहे. त्यामुळेच जनता मोदी सरकारवर खूश आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, हर घर जल योजना, मोफत लसीकरण योजना, स्टार्टअप इंडिया, महिला – युवकांसाठीची योजना तसेच काश्मीरमधील ३७० वे कमल रद्द करण्याचे मोठे पाऊल, मुस्लीम महिलांची तीन तलाक पद्धतीतून मुक्तता, पाकिस्तानला मॅुंहतोड जबाब देऊन त्यांच्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्यात आलेले मोठे यश आदींमुळे आणि ठोस अशा कार्यशैलीने मोदी हे घराघरात पोहोचले आहेत. आता २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तसेच अवघ्या हिंदू जनमानसाचे अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्याने देशभरातीलच नव्हे तर विदेशातील हिंदूही कमालीचे समाधानी झाल्याचे चित्र आहे.त्यामुळेच देशात अमृत काळ सुरू असतानाचा हा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक आहे
असेच म्हणायला हवे.