कॉपीमुक्त परिक्षांसाठी भरारी पथकांची संख्याही वाढवणार
मुंबई : दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा (10th and 12th Board Exams) म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर एक जरी चूक झाली तरी ती बराच काळ सलत राहते. अनेकदा विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असून व उत्तर येत असूनही लिहायला मात्र वेळ पुरत नाही, त्यामुळे हातचे मार्क गमवावे लागतात. यासाठीच दहावी-बारावीच्या बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षापासून परिक्षांसाठी दहा मिनिटे वाढीव वेळ देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे गरजेचे आहे.
अनेक पालक व विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्यासाठी वेळ पुरत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. उत्तरे भरमसाठ असल्याने विद्यार्थ्यांना उत्तर येत असूनही लिहिण्यास मात्र वेळ कमी पडत होता. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक- विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी दहा मिनिटे जास्त दिली जाणार आहेत. पण, हा वाढीव वेळ पेपरच्या शेवटी असणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे.
बोर्डाच्या नवीन बदलानुसार यंदा दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत असणार आहे. अनेक शाळांनी आपले विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावर येतील, असा प्रयत्न केला. पण, बोर्डाच्या नवीन नियमानुसार ते शक्य झाले नसल्याने शाळांची चिंता वाढली आहे. परीक्षेवेळी वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे देखील सांगण्याचे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून तगडे नियोजन सुरू आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांची वाढ केली जाणार असून प्रत्येक केंद्रावर बैठे पथक असेल. त्यांच्या माध्यमातून परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार थांबविले जाणार आहेत.
इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते २२ मार्च या काळात होणार आहे.