भारत जोडो न्याय यात्रेवरुन सुरु आहे खडाजंगी
मुंबई : भारत जोडो न्याय यात्रेमुळे (Bharat Jodo Nyay Yatra) आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यात राहुल गांधी सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. परवानगी नसतानाही मुख्य रस्त्यावरुन काढलेल्या यात्रेमुळे हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला. आता लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना आसाम पोलीस अटक करतील, असा इशारा हिंमता बिस्वा सरमांनी दिला आहे.
मंगळवारी २३ जानेवारी रोजी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बॅरिकेड्स तोडले. यावर सरमा यांनी म्हटले की, हिंसा ही आसामच्या संस्कृतीचा भाग नाही. आम्ही शांतताप्रिय राज्य आहोत. असे नक्षलवादी डावपेच आपल्या संस्कृतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. तुमच्या बेजबाबदार वृत्तीमुळे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यामुळे गुवाहाटीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांनी म्हटले. या सर्व प्रकरणामुळे लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढणार आहेत.
त्यानंतर पोलिसांनी कट रचणे, सार्वजनिक कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर सभा यांसह विविध कलमांखाली राहुल गांधी, जितेंद्र सिंग, के.सी वेणुगोपाल, जयराम रमेश, श्रीनिवास बीव्ही, कन्हैया कुमार, गौरव गोगोई यांच्यासह अन्य काही नेत्यांवर गुन्हा दाखल केला.
आसाममध्ये आम्हीच निवडणूक जिंकणार आहोत : सरमा
याबाबत बोलताना सरमा म्हणाले, “आम्ही लोकसभा निवडणूक झाल्यावर राहुल गांधींना अटक करू. आता अटक केल्यास राजकारण होईल. एसआयटी तपास करत आहे. लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींवर कुठलीही कारवाई करणार नाही. कारण, आसाममध्ये आम्हीच निवडणूक जिंकणार आहोत. आसाममध्ये राजकारण करण्यात अर्थ नाही.”