Thursday, July 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaratha Reservation : मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा सर्वेक्षणात 'हे' प्रश्न; उत्तर...

Maratha Reservation : मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा सर्वेक्षणात ‘हे’ प्रश्न; उत्तर काय द्याल?

मराठा तरुणांनी स्वयंसेवक म्हणून प्रगणकास मदत करण्याचे आवाहन

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे (Maratha Reservation) राज्य सरकारने महाराष्ट्र मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या दरम्यान हे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये १८३ प्रकारचे प्रश्न विचारले जाणार असून या प्रश्नांच्या बाबतीत मराठा समाजाला मार्गदर्शन व्हावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने काही मार्गदर्शक तत्वे सांगण्यात आली आहेत.

प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होण्याइतकेच मराठा समाजाची अचूक सामाजिक आर्थिक स्थिती मागासवर्ग आयोगासमोर मांडले जाणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मराठा तरुण सुशिक्षित लोकांनी या सर्वेक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत जनजागृती करून आपल्या समाज बांधवांना याची माहिती द्या. सर्वेक्षण काटेकोर होईल याची काळजी घ्या, असे आवाहन जरांगे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गावातील मराठा तरुणांनी एक आठवडाभर स्वयंसेवक म्हणून प्रगणकासोबत राहुन अचूक सर्वेक्षण होण्यास मराठा समाज बांधवांना व प्रगणकास मदत करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू असून त्यासाठी येणारा प्रगणक विविध प्रकारची माहिती भरून घेणार आहे. या सर्वेक्षणातून विचारलेल्या प्रश्नांच्या बाबतीत आपण काय माहिती सांगावी याचा नमुना देखिल सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध व्हावे यासाठी काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या बाबतीत या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे. आपण दिलेल्या उत्तरामधून मागासलेपण सिद्ध होणार आहे. असेच उत्तर द्या, असे अपेक्षित नाही. ही फक्त मार्गदर्शक म्हणून आहेत. आपल्या विवेक बुध्दीचा वापर करून व सत्य परिस्थितीचा विचार करून आपले सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे.

मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा सर्वेक्षणाबाबत मराठा समाजाने घ्यायची काळजी

▶️ सोशल मीडियावर सध्या वायरल होत असलेला मॉड्युल A

कुटुंबाची मूलभूत माहिती प्रथम भरली जाणार असून ग्रामीण भागातील लोकांनी आपले गाव दुर्गम भागात आहे असे नमूद करावे.

▶️ मॉड्युल B

प्रश्न (15) — निवासाचा प्रकार
आरसीसी घर किंवा बंगला नसल्यास मातीचे घर, विटाचे घर, दगडाचे घर याप्रमाणे नोंद घ्यायला सांगावे.

घराची मालकी सांगताना घर स्वतःच्या नावावर असेल तरच मालकीचे सांगावे अन्यथा भाड्याचे अथवा इतर असे उत्तर द्यावे.

प्रश्न (17)– गावाला जोडणारा रस्ता कसा आहे?

कच्चा रस्ता, डांबरी रस्ता चांगल्या स्थितीतील, डांबरी रस्ता खराब स्थितीतील, सिमेंट रस्ता, रस्ता उपलब्ध नाही यापैकी जे असेल त्याचीच नोंद घ्यायला लावावी.

प्रश्न (18)– पावसाळ्यात तुमच्या गावाचा इतर गावांशी पावसामुळे संपर्क तुटत असल्यास तशी नोंद घेण्यास सांगावी.

प्रश्न (20)– कुटुंबाचा प्रकार

याचे उत्तर शक्यतो विभक्त कुटुंब असे द्यावे.

प्रश्न (21)– पूर्वजांचे मूळ निवासस्थान या प्रश्नाबाबत.

अचूक माहीत असेल तरच सांगावे अन्यथा माहित नाही असे उत्तर द्यावे.

प्रश्न (22)– महाराष्ट्रात निवासाचा कालावधी

इथेच कायमचे रहिवासी आहोत असे उत्तर द्यावे

प्रश्न (23)– तुमच्या जातीचा पारंपारिक व्यवसाय कोणता?

या प्रश्नाचे उत्तर शेती असे द्यावे.

प्रश्न (24) — कुटुंबाचा सध्याचा व्यवसाय..

शेती करत असल्यास शेती. शेती करत नसल्यास मजुरी असे उत्तर द्यावे.

प्रश्न (29)– तुमच्या कुटुंबाचे सदस्य डॉक्टर वकील इंजिनियर असे व्यावसायिक आहेत का?

तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती व्यावसायिक असेल तरच होय सांगा. भाऊ किंवा भावाच्या कुटुंबातील असेल तर नाही सांगा.

▶️मॉड्युल C

प्रश्न (35)– कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्त्रोत

सरकारी नोकरीत नसल्यास मजुरी किंवा शेती असे उत्तर द्यावे

प्रश्न (36)– घराचे क्षेत्रफळ खालील प्रमाणे सांगावे…

दोन खोलीचे घर दोनशे चौरस फूट
तीन खोल्यांचे घर असल्यास ४०० चौरस फूट
चार किंवा अधिक खोल्या असल्यास ६०० स्क्वेअर फुट सांगावे.
सहा पेक्षा अधिक खोल्या असल्यास आठशे स्क्वेअर फुट सांगावे.

प्रश्न (44)– स्नानगृह

पक्के स्नानगृह नसल्यास. साधी मोरी असल्यास कच्चे स्नानगृह किंवा इतर असे उत्तर द्यावे.

प्रश्न (47)– स्वयंपाक कशावर करतात?

घरात चूल व गॅस आहे परंतु जास्त काळ चुलीवर स्वयंपाक करत असाल तर चुलीवर असे उत्तर द्यावे.

प्रश्न (50)– जमिनीचे क्षेत्रफळ किती?

बारमाही बागायती असेल तरच बागायती सांगावे अन्यथा असलेले क्षेत्र जिरायती असे सांगावे.

प्रश्न (54)– शेती मशागतीसाठी तुमच्या मालकीची कोणती साधने आहेत?

याचे उत्तर इतर साधने असे द्यावे

प्रश्न (55)– शेतीपूरक व्यवसाय आहे का?

व्यवसाय मोठा असल्यास तरच होय म्हणावे अन्यथा नाही म्हणावे.

प्रश्न (58)– कर्ज आणि बांधीलकी

गेल्या पंधरा वर्षात घेतलेल्या कर्जाचा उल्लेख करावा.

प्रश्न (61)– सध्या तुमच्यावर कोणते कर्ज आहे का?

बँक तसेच मित्र नातेवाईकांकडून उधार, उसनवार घेतलेली रक्कम सुद्धा कर्ज समजली जाते, त्यामुळे असे असल्यास होय म्हणावे.

प्रश्न (64) — कर्ज घेताना तारण किंवा गहाण ठेवावे लागले का?

तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही त्यामुळे याचे उत्तर होय असेच द्यावे.

प्रश्न (66)– कर्ज हप्ता न फेडता आल्यामुळे कर्ज देणाऱ्याने बँकेने तुमची कोणती मालमत्ता ताब्यात घेतली आहे काय?

आपण सादर केलेली माहिती ही गुप्त असणार आहे त्यामुळे असे झाले असल्यास होय असे उत्तर द्यावे.

प्रश्न (68)– कधीच कर्ज घेतले नसल्यास कर्ज न मिळण्याचे कारण

तारण ठेवण्यासाठी काही तारण नाही, बँकेच्या अटी पूर्तता करणे अवघड. किंवा हमी घेणारा नाही यापैकी उत्तर द्यावे

प्रश्न (69)– गेल्या पंधरा वर्षात तुम्ही स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे का?

कुटुंबप्रमुखांनी काही मालमत्ता विकत घेतली असेल तरच हो म्हणावे अन्यथा नाही असे उत्तर द्यावे.

प्रश्न( 71)– गेल्या पंधरा वर्षात आपण आपली स्थावर मालमत्ता विकली आहे का?

विकली असल्यास विना संकोच विकली असेच उत्तर द्या.

प्रश्न (74)– सरासरी वार्षिक उत्पन्न

पाच एकर पेक्षा कमी शेती असल्यास एक लाख पेक्षा कमी उत्पन्न सांगावे.
पाच एकर पेक्षा अधिक शेती असल्यास जास्तीत जास्त दोन लाख उत्पन्न सांगावे.

प्रश्न (81)– तुमचे कुटुंब दारिद्र रेषेखालील आहे का?

खात्रीशीर असल्यास होय म्हणावे अन्यथा माहित नाही असे सांगावे.

प्रश्न ( 84)– शेत जमीन धरण महामार्ग उद्योग पुनर्वसन व सरकारी प्रकल्पात गेली आहे का?

गेली असल्यास होय म्हणावे.

प्रश्न (85)– योग्य मोबदला मिळाला का?

कमी मोबदला मिळाला असे उत्तर द्यावे.

प्रश्न (88)– तुमच्या कुटुंबात कोणी शेतमजुरी करते का?

याचे उत्तर हो असे द्यावे.

प्रश्न (92)– स्त्रियांना मिळणारी मजुरी कशी असते?

पुरुषांपेक्षा कमी असते असे उत्तर द्यावे.

प्रश्न (96)– कुटुंबात माथाडी कामगार आहे का?

हमाली, ओझे वाहण्याचे काम करणारा असेल तर होय म्हणावे.

प्रश्न (107)– कुटुंब स्थलांतरित झाले आहे काय?

स्थलांतरित झाले असल्यास होय म्हणावे, मजुरी करता स्थलांतरित असे उत्तर द्यावे

▶️मॉड्युल D

कुटुंबाची सामाजिक माहिती

प्रश्न (112)– सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे का?

मराठा समाजाला योजनांचा फारसा लाभ मिळत नाही त्यामुळे नाही असे उत्तर द्यावे.

प्रश्न (114)– समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का?

होय असे उत्तर द्यावे.

प्रश्न (115 )– विधवा स्त्रियांना कपाला कुंकू लावण्याची अनुमती आहे का?

याचे उत्तर नाही असे द्यावे.

प्रश्न (116)– तुमच्या समाजातील दुसऱ्यांना मंगळसूत्र घालण्याचे अनुमती आहे का?

याचे उत्तर नाही असे द्यावे.

प्रश्न (117)– समाजातील विधवा औक्षण करू शकतात का?

नाही असे उत्तर द्यावे.

प्रश्न (118) व (119)– विधवा/ विधुर यांचे पुनर्विवाह होतात का?

याचे उत्तर होय असे द्यावे.

प्रश्न (120)– विधवांना धार्मिक कार्य पूजा करून दिले जाते का?

याचे उत्तर नाही असे द्यावे.

प्रश्न (121)– विधवांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आमंत्रित करतात का

नाही असे उत्तर द्यावे.

प्रश्न (122)– स्त्रियांना धार्मिक कार्यक्रमात शुभकार्यात बोलावले जाते का?

याचे उत्तर होय असे द्यावे.

प्रश्न (123)– तुमच्या समाजात घरातील स्त्रियांना डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असे बंधन आहे का?

याचे उत्तर होय असे द्यावे.

प्रश्न (124)– घरातील निर्णय प्रामुख्याने कोण घेतात?

पुरुष असे उत्तर द्यावे

प्रश्न (127)– समाज समाजात संपत्तीत मालमत्तेत स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने वाटा मिळतो का?

नाही असे उत्तर द्यावे.

प्रश्न (128)– स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क आहेत का?

होय असे उत्तर द्यावे.

प्रश्न (129) व (130)– मुलाचे व मुलीचे लग्नाचे वय

मुलीचे वय 19 ते 21
मुलाचे वय 21 ते 30 सांगावे.

प्रश्न (131)– मुलांचे लग्न उशिरा होत असल्यास कारण

आर्थिक परिस्थिती गरिबीची हे उत्तर द्यावे.

प्रश्न (132)– समाजात कोणत्या मुलासोबत मुलीचा विवाह करायचा याचा निर्णय कोण घेतात?

मुलीचे आई वडील असे उत्तर द्यावे.

प्रश्न (135)– समाजात पहिले आपत्य मुलगा झाला पाहिजे असे मानसिकता आहे काय?

होय असे उत्तर द्यावे

प्रश्न (136)– समाजात जागरण गोंधळ अन्य धार्मिक पूजेसाठी कोंबडा बकरा बळी देण्याची पद्धत आहे काय?

होय असे उत्तर द्यावे.

प्रश्न (137) — कुटुंबातील आजारी सदस्य लवकर आराम न पडल्यास दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडवांनी असे प्रकार करता काय?

होय असे उत्तर द्यावे

प्रश्न (138/ 139/ 140) — कुटुंबातील कोणी आत्महत्या केली असल्यास

आत्महत्येचे कारण आर्थिक कारणाने आत्महत्या असे द्यावे.

प्रश्न (141)– कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने शिक्षणाचा समान संधी उपलब्ध आहेत का?

नक्की नाही हे उत्तर द्यावे.

प्रश्न (142)– कुटुंबाचे सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत का?

नक्की नाही असे उत्तर द्यावे

प्रश्न (143)– तुमची जात पोट जात दुय्यम समजले जाते का?

होय असे उत्तर द्यावे

प्रश्न (144)– दुय्यम समजली जात असल्यास कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजले जाते?

ब्राह्मण जाती पेक्षा असे सांगावे.

▶️मॉड्युल E कुटुंबाचे आरोग्य

प्रश्न (145)– आजारी पडल्यास उपचारासाठी कुठे जाता?

सरकारी डॉक्टर असे सांगावे.

प्रश्न (146 )– कुटुंबातील सर्वात अलीकडचे बाळंतपण कुठे झाले?

सरकारी दवाखान्यात असे उत्तर द्यावे.

प्रश्न (147 )– कुटुंबातील सदस्याला कुत्रा, माकड चावल्यास कुणाकडे उपचारासाठी नेले जाते?

तांत्रिक, मांत्रिक किंवा डॉक्टरकडे असे उत्तर द्यावे.

प्रश्न (148)– साप विंचू चावल्यास उपचाराला कुठे घेऊन जाता?

डॉक्टर कडे असे उत्तर द्यावे.

कुटुंबातील सदस्याला कावीळ झाल्यास कुणाकडे उपचाराला नेले जाते?

घरगुती उपाय असे उत्तर द्यावे.

प्रश्न (152)– गरज पडल्यास आरोग्य सेवा उपलब्ध होतात का?

खूप कठीण किंवा उपलब्ध होत नाहीत असे उत्तर द्यावे.

प्रश्न (153)– कुटुंबाचे सदस्य नियमितपणे लसीकरण करून घेतात का?

होय असे उत्तर द्यावे.

प्रश्न (154)– मानसिक आरोग्य बिघडल्यास आरोग्य सेवा मिळते का?

नाही असे उत्तर द्यावे.

प्रश्न – मुलांना मुलींना महाविद्यालय शिक्षण अर्धवट सोडण्याची कारणे

आर्थिक परिस्थिती हे कारण द्यावे

प्रश्न – कुटुंबातील सदस्य वैद्यकीय इंजीनियरिंग सारखे शिक्षण घेत नसल्यास

शिक्षण संस्थेत शिक्षण घेणे परवडत नाही असे उत्तर द्यावे.

प्रश्न – तुमच्या कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाकरता शिष्यवृत्ती मिळत आहे का?

मराठा समाजाला कोणतीही शिष्यवृत्ती मिळत नाही, त्यामुळे कोणतीच नाही असे उत्तर द्यावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -