
नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाला काही तास उरले असताना बाजारपेठा तिरंगी रंगात सजल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिरंगा आणि खादीच्या कपड्यांना अधिक मागणी वाढली आहे. मोठमोठे व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपली दुकाने तिरंगा, दुपट्टे, माळा, पतंगांनी रंगवली आहेत. भगवा, पांढरा आणि हिरवा रंग वापरून बनवलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू बाजारात विकल्या जात आहेत.
खेळण्यांची मागणी करणारी मुले तिरंगी रंगातील टोप्या, लॉकेट आणि सोनेरी चंदेरी रंगात रंगलेल्या तिरंग्याच्या बांगड्या खरेदी करताना दिसतात. या शिवाय तिरंग्याच्या प्लास्टिकच्या टोप्या, हँड बँड आणि मुलींसाठी तिरंग्याचे दुपट्टे, हेअर बँड, बांगड्या, टी- शर्ट आदींची खरेदी केली जात आहे.
दुचाकी आणि वाहनांवर झेंडे लावण्यासाठी मोठी मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजारपेठा तिरंगा आणि इतर साहित्याने सजवण्यात आल्या आहेत. बाजारपेठांमध्ये सर्वत्र तिरंगा दिसत आहेत. वेगवेगळ्या आकारातील राष्ट्रध्वजाव्यतिरिक्त, ब्रोचेस, टोप्या, रिबन इत्यादी तिरंग्यांच्या विविध वस्तू देखील आहेत.
यासोबतच भेटवस्तूंमध्ये तिरंग्यासह घड्याळ, स्टँडसह तिरंगा इत्यादींचाही समावेश आहे. नागरिकांनी दुकानांमध्ये तिरंगा व इतर साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सिग्नल, एपीएमसी मार्केट, पालिकेच्या आठही नोडमधील दुकानामध्ये झेंडे, टी शर्ट, दुपट्टा, कुर्तीबरोबर खादीचे कपडे विक्रीसाठी दुकानात उपलब्ध आहेत. महिलांसाठी तिरंग्या साड्या तसेच खादीच्या पांढऱ्या रंगाच्या साड्यांना देखील मागणी वाढली असल्याचे व्यापारी रुपचंद राठोड यांनी सांगितले.
नवी मुंबईतील विविध शाळा, सोसायट्यांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यासाठी अनेकांचा खादीचे कपडे, खादीची टोपी, वूलनचे जॅकेट, टी शर्ट घेण्याकडे कल आहे. अशातच पूर्वी केवळ शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, शाळा-महाविद्यालये, काही निवडक वर्गातील आस्थापनांनाच राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी होती; मात्र आता देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी दिल्यामुळे तिरंग्याच्या विक्रीतही वाढ झाली आहे.