पुणे : पुण्यात मनोज जरांगेंना (Manoj Jarange Patil) मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर सरकारी पातळीवरून आता पळापळ सुरु झाली आहे. पुण्यात यात्रा पोहोचल्यापासून मराठ्यांच्या पदयात्रेला (Maratha) मिळालेल्या प्रतिसादाने वाहतुकीवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून पदयात्रेचा मार्ग बदलण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली.
दरम्यान, काल मध्यरात्री मनोज जरांगे यांची पदयात्रा मध्यऱात्री पुण्यात पोहोचल्यानंतर अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. रात्रभर पुण्यात कडाक्याची थंडी असतानाही हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. पहाटेच सभा पार पडली. पहाटेच्या सभेनंतर सकाळी वाघोलीपासून मोर्चाला सुरुवात झाली. हातात झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, एका मराठा, लाख मराठाच्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर करत नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले. प्रमुख रस्त्यावरून मोर्चा जात असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर-संचेती हॉस्पिटल परिसरात १०० किलोचा हार अर्पण करून तसेच फुलांची उधळण करून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार होते. पदयात्रेचा मार्ग शहरातून जात असल्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती. खराडी येथून सुरु झालेली पदयात्रा नगर रोडने महालक्ष्मी लॉन्स ते जहाँगिर हॉस्पिटल ते संचेती हॉस्पिटल व तेथून शिवाजीनगर कृषी महाविद्यालय समोरील चाफेकर चौकातून गणेश खिंड रोडने विद्यापीठ चौकात जाऊन तेथून औंध मार्ग, राजीव गांधी पूलमार्गे पुणे मुंबई महामार्गाने लोणावळा मुक्कामी जाणार होती. त्यामुळे या संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प होणार होती.
या परिसरात रुग्णालये असल्याने पोलिसांनी जरांगे यांना मार्ग बदलण्याची विनंती केली. ही विनंती जरांगे यांनी मान्य केली असून रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून नियोजित पदयात्रेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.