Sunday, July 14, 2024
Homeदेश‘इंडिया आघाडी’ची होणार बिघाडी!

‘इंडिया आघाडी’ची होणार बिघाडी!

पश्चिम बंगालमध्ये तृणमुल तर पंजाबमध्ये आपचा स्वबळाचा नारा

नवी दिल्ली : इंडिया आघाडीची नौका पाण्यात उतरण्यापूर्वीच हेलकावे खात असल्याचे चित्र देशभरात पश्चिम बंगाल व पंजाबमधील राजकीय घडामोडीवरून पहावयास मिळत आहे. पश्चिम बंगाल तृणमुल काँग्रेस आणि पंजाबमध्ये आपचा प्रभाव सर्वांधिक असल्याने त्यांनी काँग्रेसला पर्यायाने इंडिया आघाडीला न जुमानता स्वबळावर लोकसभा निवडणुक लढविण्याची चाचपणी सुरु केल्याने लोकसभा निवडणुकीला अद्यापि अडीच महिन्याचा कालावधी बाकी असतानाच इंडिया आघाडीची बिघाडी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. मात्र गेले काही महिने अडखळत घडपडत मार्गाक्रमण करत असलेल्या या आघाडीला पहिला तडा गेला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर काँग्रेसकडून सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, ममता बॅनर्जींना वगळून इंडिया आघाडीची कल्पना करता येणार नाही. ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीचा महत्त्वाचा भाग आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघाल्यावर रस्त्यामध्ये काही गतिरोधक येतातच. मात्र त्यातून काही ना काही मार्ग काढला जाईल.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. इथे इंडिया आघाडीतील जागावाटपामध्ये काँग्रेसने १२ जागांची मागणी केली होती. मात्र ममता बॅनर्जींनी काँग्रेसला केवळ २ जागा देऊ केल्या होत्या. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, बुधवारी सकाळी ममता बॅनर्जी यांना आपला निर्णय जाहीर करत बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडले. त्या म्हणाल्या की, माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये, आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही, असे ममता यांनी म्हटले आहे.

एनडीएविरोधात उभे राहण्यापूर्वीच इंडिया आघाडीची शकले पडू लागली आहेत. काँग्रेसने आपला प्रस्ताव मान्य केला नसल्याचा आरोप करत ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये वेगळी चूल मांडण्याची घोषणा केलेली असतानाच आता आणखी एक राज्य काँग्रेसमुळे आघाडीपासून फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ममता बॅनर्जी यांच्यानंतर आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये वेगळे लढण्याचे संकेत दिले आहेत. आप पंजाबच्या सर्व १३ जागांवर निवडणूक जिंकेल, असे वक्तव्य मान यांनी केले आहे. याचबरोबर मान यांनी आपण ममता बॅनर्जी यांच्या मार्गावर जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

दिल्लीत आप सत्ताधारी काँग्रेसलाच विरोध करून सत्तेत आली होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून आप सत्तेत आली आहे. यामुळे इंडिया आघाडीत केवळ भाजपला विरोध म्हणून आप काँग्रेससोबत जात होती. यामुळे भविष्यात आपचा मतदार दुखावला जाण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेसने सहकारी पक्षांना दाबण्याचे तंत्र अवलंबायला सुरुवात केली आहे. त्या पक्षांचे उमेदवार दुसऱ्या पसंतीची मते असतील किंवा त्यांचे खासदार असतील त्या जागाही काँग्रेस त्यांच्याकडून मागत आहे. याचाच परिणाम तृणमुलच्या वेगळे होण्यात झाला आहे. यामुळे आपही जागावाटपावरून नाराज होऊन वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेसची मागणी आपही धुडकावून लावू शकते. असे झाल्यास केजरीवालही वेगळी निवडणूक लढण्याची घोषणा करू शकतात. तेही काँग्रेसच्या अडवणुकीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करू शकतात. आप यावर लवकरच घोषणा करू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -