मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळ देणार राम मंदिराला भेट
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येतील राम मंदिराला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार २२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिले नव्हते. ते आता मंत्रिमंडळाला सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहेत.
गेल्या सोमवारी (दि.२२ जानेवारी) अभिजित मुहूर्तावर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी ट्विट करत म्हटले होते.
एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यानंतर हा दौरा निश्चित केला जाईल. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा निश्चित असला तरी त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५ फेब्रुवारी ही तारीख जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे, अख्खे मंत्रिमंडळ घेऊन रामलल्लाचे दर्शन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरू शकते.