
भाईंदर : मीरा रोडच्या नया नगर भागात झालेल्या असामाजिक प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून मीरा रोडमध्ये योगी पॅटर्नचा वापर करून अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरविण्यात आला. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू याची पोलिसांनी काळजी घेतली असून आता तणावपूर्व शांतता पसरली आहे.
मीरारोडच्या नयानगर भागात दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. या भागातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने बुलडोझर फिरवण्याची कारवाई करून आतापर्यंत ३० बांधकामांवर कारवाई केली आहे.
रविवारी रात्री नयानगर भागात झालेल्या प्रकारानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याचे आणि परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ४८ तासातच पोलिसांच्या मदतीने महापालिकेने कारवाई केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून आणखीन काही लोकांच्या अटकेची शक्यता आहे.
दरम्यान मीरा रोड भागात दंगल नियंत्रण पथकासह प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी एका पत्रकाद्वारे, परिस्थिती आता शांत असून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. शहरात तणावपूर्व शांतता पसरली असून कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद नाही.