Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअयोध्येचा उत्सव : ‘वसुधैव कुटुंबकम’

अयोध्येचा उत्सव : ‘वसुधैव कुटुंबकम’

अयोध्येत श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडला. भव्यदिव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. पाचशे वर्षांपासून करोडो रामभक्त आणि हिंदू समाजाने पाहिलेले संपूर्ण भव्य मंदिराचे स्वप्न साकार झाले. “रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, तर दिव्य मंदिरात राहणार”, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात भावुक होऊन सांगितले. “आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवले त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करतो आहोत. अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो. आजपासून एक हजार वर्षांनीही आजची ही तारीख लक्षात ठेवली जाईल आणि ही रामाचीच कृपा आहे. आजचा दिवस, दिशा सगळे काही दिव्य झाले आहे. ही वेळ सामान्य नाही.

कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे”, असेही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. २२ जानेवारी हा दिवस देशातच नव्हे, तर जगात साजरा झाला. प्रभू श्रीरामचंद्रावर नितांत श्रद्धा असणाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. लहान गावांसह संपूर्ण देशात मिरवणुका काढल्या गेल्या आणि मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. अनेक भाषांमध्ये श्रीराम कथा ऐकायला मिळाल्या. संध्याकाळी प्रत्येक घरात ‘रामज्योती’चा प्रकाश उजळला. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली असली तरी कालचक्र बदलून पुढे जाण्याचा क्षण निर्माण झाला होता. कालचक्र आणि मुहूर्त यावरून बराच गदारोळ झाला.

अयोध्येतील मंदिराचे बांधकाम पूर्ण न झाल्याने, प्राणप्रतिष्ठा करायला नको. राम नवमीचा दिवस प्राणप्रतिष्ठेसाठी का नाही निवडला? असा वास्तुशास्त्राचा हवाला देत काही पंडितांनी हिंदू समाजामध्ये दुहीचे बीज पेरण्याचा प्रयत्न केला; परंतु श्रद्धेचे बळ हे कथित वास्तुशात्रापेक्षा कितीतरी मोठे असू शकते, हे प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यामुळे पुन्हा दिसून आले. सारा देश राममय झाला होता. भगव्या पताका, वाहनांमध्ये भगवे झेंडे फडकत होते. करोडो श्रद्धाळूंच्या भावना या एकटवल्या होत्या. त्यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा ही कोणत्याही अनिष्ट घटना टाळू शकते, एवढी ताकद त्यात दडलेली असते, हे नव्याने सांगायला नको. त्याचे कारण भारतीय संस्कृतीत दगडाला देवपण देण्याची अनादी काळापासून प्रथा-परंपरा आहे. डोंगराळ भागात दगडाला शेंदूर फासल्यानंतर ज्यावेळी त्या ठिकाणी लोक माथे टेकतात. त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन अनेकांना देव पावल्याचा साक्षात्कार होतो, असे समाजात नेहमीच बोलले जाते, तर मग करोडो हिंदूंच्या भावनांचे प्रतीक असलेल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरात माथा टेकणाऱ्या भाविकांना तीच अनुभूती येऊ शकते. त्यामुळे अयोध्येतील गेल्या दोन दिवसांतील माहोल, वातावरण हे सारे काही प्रभू रामाचा आपल्या सर्वांवर आशीर्वाद असल्याची प्रचिती देणारा ठरला आहे.

प्राणप्रतिष्ठेनंतर २४ तासांच्या आत ३ लाखांहून भाविक दाखल झाले आहेत. या भाविकांच्या श्रद्धेतून अद्भुत चमत्कार पाहायला मिळू शकतात. हे मंदिराचे स्व्प्न पाहणाऱ्या हजारो कारसेवकांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकला होता. स्वर्गस्थ कारसेवकांनाही रामलल्ला अयोध्येत विराजमान झाल्याचे पाहून स्वर्गातून आनंद नक्कीच झाला असेल. आता तुम्ही म्हणाल, स्वर्गाचा काय संबंध आहे. ते पण सिद्ध करू शकत नाही; परंतु आशीर्वाद मिळाल्यामुळे कल्याण होते, ही भावना जोपर्यंत समाजात असेल, तोपर्यंत श्रद्धेलाही मरण नाही. पंतप्रधान मोदी यांनीही हाच धागा पकडून विरोधकांना आवाहन केले की, “या, तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या विचारांचा पुन्हा विचार करा. राम आग नाहीये, राम ऊर्जा आहे. राम विवाद नाही, राम समाधान आहे. राम फक्त आपले नाहीत, राम सगळ्यांचे आहेत. राम फक्त वर्तमान नाही, तर अनंत काळ आहे…”

अनेक शतकांनंतर आपल्या रामाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आशंका व्यक्त करणाऱ्यांनी आपल्या सामाजिक नीतिमत्तेची जाणीव ठेवायला हवी. हा केवळ श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नसून श्रीरामाच्या रूपाने प्रकट झालेल्या भारतीय संस्कृतीवरील अतूट श्रद्धेचीही ही प्राणप्रतिष्ठा आहे, या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. पूर्ण जगाची काळाची गरज असलेल्या मानवी मूल्यांचे आणि सर्वोच्च आदर्शांचे प्रभू राम हे मूर्त स्वरूप आहे. त्यामुळे हे रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे. प्रभू राम हा भारताचा विश्वास, पाया, कायदा, चेतना, विचार, प्रतिष्ठा आणि वैभव आहे. राम हा प्रवाह आहे, राम प्रभाव आहे. राम म्हणजे नीती. राम अनादी आहे. राम म्हणजे सातत्य. राम विभूती आहे.

राम सर्वव्यापी आहे, जग आहे, वैश्विक भावना आहे. प्राणप्रतिष्ठेने संपूर्ण जग जोडले गेले आहे आणि राम हा सर्वव्यापी असल्याच्या अनुभूतीवर पंतप्रधानांनी भर दिला होता. अशाच प्रकारचे उत्सव अनेक देशांमध्ये पाहायला मिळत असले तरी अयोध्येचा उत्सव हा रामायणातील जागतिक परंपरांचा उत्सव बनला आहे, ही ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना बनली आहे. आताचा काळ हा भारताचा आहे आणि भारत प्रगती साधत पुढे जाणारा आहे. शतकानुशतके वाट पाहिल्यानंतर आपण इथे पोहोचलो आहोत. आपण सर्वांनी या युगाची, या कालावधीची वाट पाहिली. भविष्य हे यश आणि कर्तृत्वासाठी समर्पित आहे आणि हे भव्य राम मंदिर भारताच्या प्रगती आणि उदयाचे साक्षीदार असेल, यात तिळमात्र शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -