बाळासाहेबांचा पोशाख करणार्या उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका
मुंबई : अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारी रोजी भव्य असा रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा (RamLalla Pran Pratishtha) सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते, मात्र ते अयोध्येला गेले नाहीत. त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात (Nashik Kalaram Mandir) जाऊन पूजा केली. तसेच गोदावरीची महाआरती केली. यानंतर त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. शिवाय नाशिकमधील या पूजेसाठी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखा (Balasaheb Thackeray) पोशाख केला होता. भगव्या रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा आणि गळ्यात माळा घातल्या होत्या.या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टीकास्त्र उपसले. ‘लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो काय वाघ होत नाही’, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांसारखे भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळा घातल्या म्हणजे कुणाला बाळासाहेब होता येणार नाही. त्यासाठी बाळासाहेबांसारखे प्रखर विचार असावे लागतात. लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचे काळीज लागते. वाघ एकच आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे”.
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आमची घराणेशाही आहे. पण ती वडिलोपार्जित घराणेशाही आहे. आम्ही ३० वर्षांत भाजपवाले झालो नाहीत, मग काँग्रेसवासी कसे होऊ असा सवाल ठाकरेंनी विचारला होता. त्यावर, चोख प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या ताटाखालील मांजर होऊन सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी मिंधेपणा करणारे सर्वात मोठे मिंधे कोण..? ये पब्लिक है… सब जानती है!, अशी चपराक मुख्यमंत्र्यांनी लगावली.