फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
सगळ्याच क्षेत्रांत, समाजातच नव्हे, तर अगदी कुटुंबातसुद्धा प्रचंड स्पर्धा आणि चढाओढ सुरू आहे. प्रत्येकाला पुढे जायचं आहे, मोठं व्हायचं आहे, प्रसिद्ध व्हायचं आहे, नावलौकिक प्राप्त करायचा आहे, श्रीमंत व्हायचं आहे. अगदी आपल्याजवळ जे नाहीये ते दाखवून, तसा आभास निर्माण करून का होईना पण प्रत्येकाला मोठेपणा, मान-सन्मान हवा आहे. यश मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायचे असतात. हे जरी खरं असलं तरी किती खालच्या पातळीवर जावून ते करायचे, हे कोणीच बघत नाही. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नसलंच पाहिजे, या फाजील अपेक्षा उराशी बाळगून अनेकदा अनेकजण इतरांच्या चांगल्या कामात खोडा घालताना, इतरांना मागे खेचताना दिसतात. वास्तविक कोणालाही कुठेही यश मिळवायचे असेल, मोठं व्हायचं असेल, मानाचे स्थान मिळवायचे असेल, तर त्यासाठी प्रचंड मेहनत, सचोटी, सत्यता, सातत्य, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, संयम लागतो हे आपण जाणतो.
स्पर्धा नक्कीच असावी. स्पर्धक पण असावा पण या स्पर्धासुद्धा नीतिमूल्यांशी तडजोड न करता, इतरांची मानहानी, आर्थिक नुकसान अथवा इतरांना बदनाम न करता कराव्यात असे वाटते. ईर्षा असावी, पण खुन्नस नसावी. स्वतःचं ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाकांक्षा नक्कीच असावी. पण त्यासाठी इतरांना बदनाम करून, दुसऱ्याचं नाव खराब करून आपण कधीच जिंकू शकत नाही, याची जाणीवसुद्धा असावी. महिला, पुरुष, तरुण मुलं आजकाल सर्रास कोणाहीबद्दल काहीही पटकन बोलून जातात. एखाद्याबद्दल आपण काय बोलतो, का बोलतोय, जे बोलतोय ते कितपत खरं आहे, आपल्याला स्वतःला आपल्या वक्तव्याबद्दल खात्री आहे का, आपण शहानिशा केली आहे का, आपल्या बोलण्यामुळे विनाकारण कोणाचं नाव खराब होत आहे का, याचा अजिबात विचार केला जात नाही. कुटुंबात, समाजात अशा पद्धतीने दुसऱ्याचा नावलौकीक, कर्तृत्वाची पूर्ण माहिती न घेता, परिस्थितीची जाणीव नसताना करणं किती चुकीचं आहे, हे गांभीर्याने घेतलं जात नाही.
समुपदेशनादरम्यान अनेक घरगुती वाद, कौटुंबिक प्रश्न सोडवतानासुद्धा हे प्रकर्षाने जाणवते की, कुटुंबातील एखादी व्यक्ती कितीही चांगलं काम करत असेल, पुढे जात असेल, मेहनत करत असेल तरी त्याच्याच घरातले लोक त्याच्या कामावर जळत असतात. अनेक निकटवर्तीयांच्या मनात त्याच्याबद्दल आसुया असते, ईर्षा असते, राग असतो. त्या व्यक्तीला मागे खेचण्यासाठी, खाली पाडण्यासाठी, त्याला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याच्या कामात अनेक अडथळे आणले जातात. अथक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा संबंधित व्यक्ती मागे हटत नाही, त्याचा नावलौकीक वाढत जातो, तेव्हा आता त्याचं नाव खराब करण्यासाठी काय करता येईल, असा विचार विकृत माणसं करतात. त्यात बहुतेक जवळचीच माणसं जास्त असतात हे दुर्दैव आहे.
अशा वेळी ज्याचं काम चांगलं आहे, त्याचं नाव खराब करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. घरात चांगलं काम करणारी, यश मिळवण्यासाठी धडपडणारी व्यक्ती असेल, तर तिलासुद्धा घरातल्याच लोकांच्या निंदेचा, राजकारणाचा सामना करावा लागतो. एखादी व्यक्ती कितीही चांगल्या मार्गाने काम करत असेल, वेगळा काही प्रयत्न करत असेल, उत्पन्नासाठी, प्रसिद्धीसाठी स्वतःचं कलाकौशल्य, बुद्धिमत्ता, हुशारी वापरून पुढे जात असेल, त्याला नावाजलं जात असेल तरीसुद्धा त्याच्याबद्दल चुकीचेच बोलले जाते. चांगलं काम करणाऱ्याला नाउमेद करण्यासाठी, त्याचं मनोधैर्य खचवण्यासाठी त्याच्याच जवळचे लोक सतत त्याला बदनाम करतात. त्याचा एखाद-दुसरा चुकीचा मुद्दा उचलून धरायचा आणि त्यावरच सगळ्यांशी चर्चा करायची, जेणेकरून संबंधित व्यक्तीचं लक्ष विचलित होईल, तो घाबरून जाईल, तो त्याचं काम सोडून देईल.
दुसरा जे काही करतोय, त्याचं कौतुक करणं, त्याला प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणं तर दूरच पण त्याच नाव घरात, समाजात इतकं खराब केले जाते की, सगळेच त्याला चुकीचा समजू लागतात. आपण जे करू शकलो नाही किंवा आपण जे करू शकत नाही, ते दुसरा चांगल्या पद्धतीने करतोय, हे पचवण्यासाठी खूप खिलाडूवृत्ती आणि मनाचा मोठेपणा लागतो, जो बहुतांश लोकांकडे नसतोच. जो सरळ आणि शुद्ध मार्गाने चालला आहे त्याला डिवचत राहायला, त्याचं नाव कसं खराब करता येईल, यासाठी लोक प्रयत्न करतात. अशा वेळी आपलं कामधाम सोडून, त्यावरच लक्ष जाऊन आपलं नाव कोण खराब करत आहे, कां करत आहे, आपल्याच बाबतीत असं का होत आहे, आता माघार घ्यावी का, आपण चुकतोय का, आपल्याला खरंच काहीच जमत नाहीये का? हा विचार करून अनेकजण थांबून जातात, संपून जातात. सतत आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी कानावर आल्यामुळे अनेकांना नैराश्य येतं, भीती वाटते, स्वतःची लाज वाटू लागते, आत्मविश्वास जातो आणि विकृत मानसिकतेच्या लोकांना हेच हवं असते. तुमच्या अगदी कितीही जवळचे असले तरी सगळेच तुमचे हितचिंतक नसतात, हे आवर्जून लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
‘सुअर झुंड मे आते है शेर अकेला चलता है’ या उक्तीनुसार तुम्ही तुमच्या ध्येयाकडे एकट्याने सातत्याने वाटचाल करणे आवश्यक असते. आपल्या कामात विनाकारण बिनकामी लोकांना सहभागी करून घेणे टाळावे. आपल्या कामाची पद्धत, आपली स्वप्न, आपले नियोजन सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांचेच सल्ले घेत बसलं, तर आपला चिरंतन विकास कधीच होऊ शकणार नाही. ज्याला खरच आपल्याप्रति आत्मियता आहे, ज्याला खरच आपलं चांगलं झालेलं पाहायला आवडेल, अशाच लोकांशी आपल्या ध्येयाबाबत बोला. जे नकारात्मक मानसिकतेचे आहे, जे आपल्यामागे आपलं हसू करतात, आपल्याला तोंडावर गोड बोलून माघारी आपलीच मजाक उडवतात, अशा लोकांना अजिबात जवळ करू नका. आपल्याबद्दल सार्वजनिक चर्चा करणारे, आपल्या सर्व खासगी गोष्टी उघड करणारे, आपलं खासगी आयुष्य जगासमोर आणणारे लोक आपल्या कामातील सर्वात मोठा अडथळा असतात.
स्वतःचे वैयक्तिक हेतू, स्वार्थ साधण्यासाठी, आर्थिक फायद्यासाठी जे लोक आपल्याला चिटकून आहेत त्यांना पहिले लांब करा. आपल्यातील नेतृत्वगुण ज्यांना मान्य नाहीत, जे आपले विरोधक आहेत त्यांना ओळखायला शिका. आपल्या कामावर सतत चुकीची अथवा मुद्दाम टीकाटिप्पणी करणाऱ्यांना आपल्याजवळ येऊ देऊ नका. अनेकजण असे असतात जे आपल्या चांगल्या कामात व्यत्यय आणायला, आपल्याला चुकीच्या पद्धतीने काम करायला प्रवृत्त करायला, आपलीच दिशाभूल करायला तत्पर असतात. अशा लोकांच्या सहवासात, संपर्कात राहणे कटाक्षाने टाळा.
आपल्यापेक्षा कमी अनुभव, कमी बुद्धिमत्ता, कमी शिक्षण असलेले लोक आपण खूपदा जवळ करतो. कारण ते आपलं ऐकतील, आपल्याला मदत करतील, आपल्यावर वर्चस्व गाजवणार नाहीत, आपल्यापेक्षा कमी असणारे लोक आपला आदर करतील, आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही असा आपला समज असतो. तरीही असे लोक आपल्यासाठी घातक ठरतात, कारण आपली आणि त्यांची वैचारिक बौद्धिक पातळी कुठेही जुळत नसते. असे लोक सांगकामे म्हणून खूप चांगल काम करतातदेखील, पण ते आपल्याला काय चूक, काय बरोबर हे कधी सांगत नाहीत. जे लोक फक्त आपल्या हो ला हो करतात आणि आपण काहीही सांगितलं, कोणताही निर्णय घेतला तरी मान डोलावतात ते कधीही आपले शुभचिंतक नसतात, हे समजायला खूप उशीर लागतो.
आपल्या स्तराची बुद्धिमत्ता, वैचारिकता, आपल्या तोडीची किंवा त्याहून अधिक प्रगल्भ लोक, शहाणे लोक, आपल्याला वेळोवेळी सावध करणारे लोक सोबत असतील, तर निदान आपण यशस्वी झालो तरी आपलं नाव खराब होऊ नये एवढी काळजी नक्कीच घेतात. त्यामुळे शक्य तो प्रयत्न असाच असावा की, आपल्या कार्यकर्तृत्वात, नियोजनात जास्त कोणी ढवळाढवळ करणारे नसावे, सल्ले मार्गदर्शन जरूर घ्यावे. पण ते देणारे लोक तशा गुणवत्तेचे असावेत. सोबत मिळत आहे, हातभार लागत आहे, मदत होत आहे म्हणून कोणालाही जर आपण आपल्या कारभारात सहभागी करून घेतलं, तर खूप मनस्ताप, वेळेचा अपव्यय, आर्थिक नुकसान, कामाचा खोळंबा आणि नाव खराब व्हायला वेळ लागत नाही.
क्षेत्र कोणतंही असो, त्यात नाव कमवायला, प्रसिद्ध व्हायला, उंचीवर जायला खूप वेळ लागतो. पण तेच नाव चुकीची संगत, चुकीची टीम, चुकीचे निर्णय आणि त्यांनीच केलेली बदनामी यामुळे खराब पटकन होतं. आपण स्वतः जे निर्माण करू ते शाश्वत असते, कायमस्वरूपी असते. चुकीच्या लोकांना सोबत घेऊन, नको त्यांना मोठं करून आपण मात्र अनेकदा लहान होतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपले हेतू कितीही चांगले असले तरी आपला बहुमोल वेळ आणि आपली बुद्धिमत्ता कोणावर, किती काळ खर्च करायची हे ठरवणे महत्त्वाचे आहे.
आपलं काम छोटं असो की मोठं ते कोणावर अवलंबून नसेल, आपण त्यासाठी कोणाचे मिंदेपण घेणार नाही, इतकी काळजी जरूर घेतली जावी. आपला कोणी वापर करणार नाही, आपलीच हुशारी आपलंच नाव वापरून भलताच रुबाब करणार नाही, ही खबरदारी पण घ्यावी. आपणच मोठे केलेले, नावारूपाला आणलेली माणसं आपलीच पतप्रतिष्ठा घालवतील, असं आपल्याच चुकीच्या निर्णयामुळे होऊ देऊ नये. त्यामुळे आपल्या कामावर, आपल्या कर्तृत्वावर आघात करूनही ज्यांचं समाधान होत नाही, ते आपलं नाव खराब करायला पुढे असतात.