ज्या क्षणाची पिढ्यान् पिढ्या प्रतीक्षा केली जात होती, तो क्षण सोमवारी अयोध्याधाममध्ये दुपारी शुभ मुहूर्तावर ठीक १२ वाजून २० मिनिटांनी आला आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ज्या अयोध्येत रामलल्लाला एका छोट्याशा झोपडीवजा जागेत वास्तव्य करावे लागत होते, त्या रामलल्लांना यावेळी शुभ मुहूर्तावर अत्यंत शानदार अशा मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आले. युगानुयुगे वाट पाहून अखेर रामलल्लांना मंदिर मिळाले. संपूर्ण देश राममय झाला आहे. रामलल्लाच्या अत्यंत मोहक, लोभस अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे आणि तमाम भारतवासीयांचे मन आज भावनांनी अनावर झाले आहे. रामलल्ला पुन्हा साडेपाचशे वर्षांनी अयोध्याधाममध्ये परतले आहेत. याच क्षणाची अवघे भारतवर्ष वाट पाहत होता. सारे भाविक प्रतीक्षा करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अलौकिक क्षण कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात आणला आहे. सारे भारतवर्ष त्यासाठी मोदी यांचा कृतज्ञ राहील. पण हा क्षण आणण्यात खूप मोठी लढाई लढावी लागली आहे. कित्येक लोकांना प्राणांचे बलिदान द्यावे लागले. शरयू नदीत कारसेवकांच्या रक्ताचे पाट वाहिले. शरयू नदी कारसेवकांच्या रक्ताने न्हाऊन निघाली. अखेर आता साऱ्या कटू स्मृती मागे ठेवून राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे जे साक्षीदार झाले ते पुढील कित्येक पिढ्यांना आपण या क्षणाचे साक्षीदार होतो, हे अभिमानाने सांगतील. सारे सेलेब्रिटीज, नेते, अभिनेते आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर सनातन संस्कृतीचा आविष्कार पाहण्यासाठी सोहळ्यास उपस्थित होते.
अवघ्या जगाने हा क्षण पाहिला आहे आणि सनातन संस्कृतीचा हा आविष्कार पाहण्यासाठी अवघी सृष्टी तेथे डोळ्यांत प्राण आणून एकवटली असेल. सनातन संस्कृती ही भारत वर्षाचा श्वास आहे आणि प्राण आहे. वास्तविक राम मंदिराच्या प्रश्नावर राजकारण केले गेले. राम मंदिर उभारणीला अनाठायी विरोध करण्यात आला आणि अखेर हा तंटा न्यायालयात गेला. हिंदूंची बहुसंख्या असलेल्या या देशात हिंदूंना आपल्याच रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जीवाच्या कराराने झगडावे लागले. कित्येक वर्षे हा झगडा चालला आणि काँग्रेसने अल्पसंख्याकांच्या मतांसाठी मंदिराला विरोध केला. आता श्रेय घेण्यासाठी काँग्रेसने राजीव गांधी यांच्या काळात अयोध्येच्या मूळ मंदिराची चावी देण्यात आली होती, असा खोटा दावाही केला.
आता राम मंदिरमय भारत झाला असताना त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेक पक्ष आणि नेते पुढे आले. पण राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषद, भाजपा आणि संघानेच खरा संघर्ष केला, हे अवघ्या भारतवर्षाला माहीत आहे. मोदी यांनी या अद्भुत क्षणाची भेट १३५ कोटी भारतीयांना दिली आहे. राम मंदिरात रामघोषात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि देशभरात जणू उत्सवाचे वातावरण आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा असे वातावरण होते. आता त्या वातावरणाची कल्पना आजच्या जल्लोषावरून येते. ही दुसरी स्वातंत्र्याची लढाईच होती. राम मंदिर उभारणीच्या मुद्द्यावरून आणि भव्य अशा सोहळ्याच्या आयोजनावरून काही विघ्नसंतोषींनी भारत आता हिंदू राष्ट्र होण्याकडे वाटचाल करू लागला आहे, अशी कोल्हेकुई सुरू केली आहे. पण ज्या राष्ट्रात ८५ टक्के हिंदू आहेत, त्या राष्ट्राने हिंदू राष्ट्र व्हावे नाही तर काय व्हावे? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही.
काँग्रेसच्या काळात हिंदू म्हणवून घ्यायची शरम वाटत असे आणि उघडपणे लोक हिंदू आहोत हे सांगायला लाजत असत. त्यांच्यात एक प्रकारची अपराधीपणाची भावना काँग्रेसने सत्तर वर्षांच्या राजवटीत लोकांच्या मनात निर्माण केली होती. लोकांच्या मनातील ती अपराधीपणाची भावना निघून गेली आहे. याचे श्रेय निःसंशय मोदी यांनाच आहे. हिंदूंमध्ये नवीन चेतना आणि नवा विश्वास जागृत करण्याचे काम मोदी यांनी केले आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा समारंभाला निमंत्रण दिले असूनही काँग्रेस नेत्यांनी अयोध्येला न जायचा निर्णय घेतला. या करंटेपणाचे कारण अर्थातच अल्पसंख्याक मतांवर परिणाम होऊन अल्पसंख्याक मतदार नाराज होऊ नयेत, हेच आहे. पण काँग्रेस या मतांच्या राजकारणातून बाहेर येऊन कधी प्रगल्भपणा दाखवणार, हा खरा प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी कुणी मंदिरात जावे हेही मोदीच ठरवणार का, असे विचारले आहे. पण काँग्रेसने कालच्या समारंभावर जो बहिष्कार टाकला, त्याचे समर्थन राहुल यांच्याकडे नाही. काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा ढोंगी पक्ष आहे. कारण राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी हे राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकतात आणि दुसरीकडे निवडणूक आली की, जणू उधारी ब्राह्मण असल्याचे सांगत वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देत असतात. हे ढोंग कुणाच्या लक्षात येत नाही, असे त्यांना वाटते.
आता देश राममय झाला असल्याचे पाहून हिंदू व्होट बँकेत आपलाही वाटा असावा म्हणून काँग्रेस राजीव गांधी यांनी, शिलान्यास करण्यास परवानगी कशी दिली, हे सांगत आहे. पण मुसलमानांना खूश करण्यासाठी शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवल्यानंतर हिंदू नाराज होतील आणि म्हणून त्यांच्यासाठी शीलान्यासाची परवानगी दिली जावी, हे शहाणपण काँग्रेसला उशिरा सुचले. त्यानंतर मग शिलान्यासाची परवानगी देण्यात आली. धर्मसत्तेचे राजसत्तेवर आक्रमण चालेल, असाही अपप्रचार पुरोगामी पिलावळीने सुरू केला आहे. पण भारतात धर्मसत्ता कधीही प्रबळ झाली नाही. भाजपाला निवडणुकीत फायदा होईल ही खरी पोटदुखी त्यांच्या ओरड्यामागे आहे. रामघोषाने देश दुमदुमून गेला आहे आणि त्यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे, अशी भावना आज हिंदूंची आहे.