वसई : रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम करत असताना वसई (Vasai) आणि नायगाव (Naigaon) रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनच्या अपघातात (Train Accident) तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल रात्री ८.५० वाजता घडली.
चिफ सिग्नल इन्स्पेक्टर वासू मित्रा (वय ५६), टेक्निशिअन सोमनाथ उत्तम (वय ३६), असिस्टंट सचिन वानखडे (वय ३५) असे मयत रेल्वे कर्मचा-यांची नावे आहेत. नायगाव आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक चेंज करण्याची पॉईंट मशिन फेल झाली असल्याने त्याच्या तपासणीचे काम हे तिघेजण करत होते. त्याच दरम्यान विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक २ हून चर्चगेटच्या दिशेने जात असताना, हे तिनही कर्मचारी रेल्वे खाली आले. यात तिघांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, यातील सोमनाथ उत्तम यांचा मृतदेह सोलापूरला त्यांची गावी नेण्यात आला. सचिन वानखडे यांचा मृतदेह नागपूरला नेण्यात आला तर वासू मित्रा यांचा मृतदेह वसई येथे नेण्यात आला आहे. हा अपघात कसा झाला. यात निष्काळजीपणा कुणाचा याबाबात आता रेल्वे प्रशासन चौकशी करत आहे.