Tuesday, July 23, 2024
Homeदेशशिक्षक नव्हे हा नराधम निघाला राक्षस

शिक्षक नव्हे हा नराधम निघाला राक्षस

१७ वर्षीय मुलीच्या घरात घुसून अत्याचारानंतर हत्या करुन मृतदेह लपवला पाणीच्या टाकीत

बाडमेर : शिक्षकाच्या पेशाला काळीमा फासत एका नराधम शिक्षकाने घरात घुसून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी तिची हत्या केली. कुणालाही समजू नये म्हणून मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवला. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात घडली आहे.

ही सर्व घटना घडली तेव्हा मुलीच्या घरचे घराबाहेर होते. ते घरी परतल्यानंतर मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी शोधाशोध सुरु केली असता मुलीचा मृतदेह टाकीत आढळला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह त्यांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली.

प्राथमिक तपासानुसार, मुलगी ज्या ठिकाणी शिकत होती, त्या शाळेतील शिक्षक त्या मुलीचा पाठलाग करायचा. आरोपीचे नाव प्रल्हादराम आहे. त्याला मुलीच्या घरी कुणी नसल्याचे समजले होते. नराधम शिक्षकाने याच संधीचा फायदा घेतला. घरात कुणीच नाही, हे ओळखून त्याने मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली अन् मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला आणि पसार झाला.

पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रल्हाद गावातील सरकारी शाळेत कार्यरत होता. तो हिंदी विषय शिकवतो. त्याचं वर्तन व्यवस्थित नव्हतं. तो मुलींसोबत वारंवार छेडछाड करायचा. त्याशिवाय शारीरिक संबंध करण्यासाठी मुलींवर दबाव टाकत होता. हत्या झालेल्या मुलीसोबतही त्याने छेडछाड केली होती. मुलीने शिक्षकाबद्दल कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर पंचायत बोलवण्यात आली. त्यावेळी आरोपीला समजावून सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या मनात राग वाढला. त्याने शनिवारी संधी पाहून मुलीवर अत्याचार केले आणि त्यानंतर खून केला. पोलिसांनी या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तात्काळ तपासही सुरु केला. पोलिसांनी फरार आरोपीला सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -