
हवेची गुणवत्ता पातळी घसरली...
मुंबई : अयोध्येच्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) काल रामलल्लाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा (Pran Pratistha) पार पडली. यामुळे हिंदूंची (Hindu) पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली. हा अभूतपूर्व क्षण देशभरात अत्यंत आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, रामाच्या कलाकृतींचे प्रदर्शन, महाप्रसाद वाटप, महाआरती असे उपक्रम राबवण्यात आले. मात्र, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून हा दिवस साजरा करण्यात आला. मुंबईत याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा प्रदूषणाची (Pollution) पातळी घसरली आहे.
गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality Index)अत्यंत घसरली होती, हवेचा निर्देशांक अतिधोकादायक पातळीपर्यंत पोहोचला होता. अवकाळी पावसामुळे हे प्रदूषण आटोक्यात येण्यास मदत झाली होती. मात्र, आता मुंबईकर मोकळा श्वास घेतात तोच पुन्हा एकदा मुंबईची हवा प्रदूषित झाली आहे. काल ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्ता पातळीचा निर्देशांक १२३ वर पोहोचला आहे, जो हवा खराब असल्याचे दर्शवतो.
मुंबईतील PM2.5 वायू प्रदूषणामुळे १ जानेवारी २०२१ पासून अंदाजे १४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सध्याचे PM2.5 चे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २४ तास हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वे मूल्यांद्वारे शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा तीनपट जास्त आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा काळजी घेणं गरजेचं आहे.